खानापुरला आमदार अनिल बाबर यांच्याकडून ३ कोटी निधी
वार्ताहर / खानापूर
खानापूर नगरपंचायतच्या माध्यमातून खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी खेचून आणण्यात कुठेही कमी पडणार नाही अशी ग्वाही आमदार अनिल बाबर यांनी दिली होती. आमदार अनिल बाबर यांच्या प्रयत्नातून खानापूर नगरपंचायतच्या प्रशासकीय इमारत बांधकामासह शहरातील विविध विकासकामांसाठी वैशिष्ट्यपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान – ठोक तरतूद योजनेतून तीन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खानापूर जनता विकास आघाडीचे नेते, माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे यांनी दिली. नगराध्यक्ष तुषार मंडले, उपनगराध्यक्ष ज्ञानदेव बाबर, शिवसेना तालुका प्रमुख दादासाहेब भगत, बांधकाम सभापती उमेश धेंडे, भारत सरगर, माजी सरपंच खंडू मंडले आदी मान्यवर उपस्थित होते.
सुहास शिंदे म्हणाले, खानापूर नगरपंचायतच्या माध्यमातून शहरातील अनेक भागात रस्ते, अंतर्गत गटारी, पेव्हिंग ब्लॉकची कामे सुरू आहेत. काही कामे पूर्ण झाली आहेत. गेल्या चार वर्षात स्वच्छ सर्वेक्षणसह अनेक नेत्यांच्या माध्यमातून भरपूर निधी मिळाला आहे. मात्र खानापूर नगरपंचायतची प्रशासकीय इमारतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. आमदार अनिल बाबर यांच्या पाठपुराव्यातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्याने वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान -ठोक तरतूद योजनेतून नगरपंचायत प्रशासकीय इमारत बांधकामासाठी दोन कोटी रुपये निधी मंजूर झाला आहे.
तसेच शहरातील वाणी- तेली समाज दफनभूमी सोयी सुविधा, आतार- तांबोळी मुस्लिम समाज दफनभूमी सोयी सुविधा, कुंभार समाज दफनभूमी आणि माळी समाज दफनभूमी सोयी सुविधासाठी प्रत्येकी २५ लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. आमदार अनिल बाबर यांनी खानापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी दिशा ठरवताना रस्ते, प्रशासकीय इमारत त्याचबरोबर सोयी सुविधावर भर दिला आहे. येत्या काळात शहरातील कोणतेही काम अपूर्ण राहणार नाही याची काळजी घेतली जाणार असून आमदार अनिल बाबर यांनी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली आहे. अशी माहिती सुहास शिंदे यांनी दिली.
यावेळी चेअरमन महेश माने, बबन माने, राजेंद्र टिंगरे, सदाशिव भगत, धनाजी कदम, भरत टिंगरे, सतीश भगत, शहाजी भगत, विकास भगत, यांच्यासह मुस्लिम, वाणी, तेली, माळी व कुंभार समाजातील नागरिक उपस्थित होते.