नाल्याजवळ कपडे आढळल्याने नाल्यात शोधमोहिम सुरु
प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर शहरातील 16 वर्षाची दोन मुले शनिवार दि. 14 पासून बेपत्ता झाली आहेत. शनिवारी दुपारी फिरायला जातो, असे सांगून बाहेर पडली होती. पण रात्री उशीरापर्यंत ती घरी न परतल्याने त्यांचा शोध सुरू झाला. त्या दोघांचेही कपडे व मोबाईल खानापूर शहराजवळ असलेल्या हालात्री नाल्याजवळ सापडले. त्यामुळे ते दोघेही हालात्री नाल्यात बुडाले असावे, असा दाट संशय निर्माण झाला आहे.
त्या दोन मुलांमध्ये उमेर मुस्ताक खलिफा रा. बाहेर गल्ली, खानापूर व अरफात शहाखलिद अरकोटी रा. रविवार पेठ खानापूर यांचा समावेश आहे. ते दोघेही जीवलग मित्र होते. ते येथील स्वामी विवेकानंद शाळेमधून यावर्षी दहावी परीक्षाही उत्तीर्ण झाले आहेत. ते दोघे व आणखीन एक त्यांचा मित्र तिघे मिळून एका दुचाकीवरून फिरायला गेले होते. पण त्यांची दुचाकी खानापूर-हेमाडगा रस्त्यावर रुमेवाडीनजीक पेट्रोल संपल्याने बंद पडली. यामुळे उमेर व अरफात त्याच ठिकाणी थांबले व त्यांचा तिसरा मित्र गाडीत पेट्रोल भरण्यासाठी पुन्हा खानापूरला आला. त्या गाडीत पेट्रोल घालून तो पुन्हा उमेर आणि अरफात यांना घेण्यासाठी गेला. त्यावेळी ते दोघेही त्या ठिकाणी नव्हते.
त्याने त्या दोघांचा बराच वेळ शोध घेतला. पण ते दोघेही न सापडल्याने खानापूरला येऊन त्यांच्या घरी माहिती दिली. यानंतर त्यांचा शोध सुरू झाला. रविवारी सकाळी त्या दोघांचेही कपडे, मोबाईल व चप्पल हालात्री नाल्याच्या काठावर सापडले. यामुळे ते दोघेही हालात्री नाल्यात बुडाल्याचा संशय निर्माण झाल्याने त्या नाल्यामध्ये दोघांचाही शोध घेण्यात आला. रात्री उशिरापर्यंत त्यांचा शोध लागू शकला नाही. सोमवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम हाती घेण्यात येणार आहे. या प्रकरणाची खानापूर पोलीस स्थानकात नोंद झाली आहे..