दहावीपूर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्यात अडचणी
प्रतिनिधी /खानापूर
कर्नाटक शासनाकडून अनुसूचित जाती-जमाती व ओबीसी गटातील दहावीपूर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची 31 डिसेंबर अखेरची मुदत आहे. यासाठी आवश्यक उत्पन्न दाखला देण्यास तहसीलदार कार्यालयात सावळा गोंधळ सुरू असून वेळेत उत्पन्न दाखला मिळत नसल्याने अनेकांना शिष्यवृत्तीला मुकावे लागण्याची वेळ येणार आहे. या संदर्भात एक तर 31 डिसेंबर असलेली मुदत वाढवावी, तसेच विद्यार्थ्यांना तातडीने उत्पन्न दाखले मिळतील याची व्यवस्था करावी, अशी मागणी केली जात आहे.
या संदर्भात गर्लगुंजीतील पालक व विद्यार्थ्यांकडून बुधवारी तहसीलदारांना निवेदन सादर करून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, आधीच ऑनलाईनद्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया वेळेत सुरू झालेली नाही. सर्व शाळा मुख्याध्यापकांनी केवळ सात दिवसांपूर्वी याची माहिती दिली. यानंतर ऑनलाईनद्वारे अर्ज करण्यासाठी पालकवर्गांची धावपळ सुरू झाली. आवश्यक असलेला उत्पन्न दाखला मिळण्यासाठी पालकवर्गाने अर्जही सादर केले आहेत. पण तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्न दाखला मिळण्यास विलंब होत आहे. अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या पाहता तसेच तहसीलदार कार्यालयाकडून होत असलेला विलंब लक्षात घेता 31 डिसेंबरपर्यंत ऑनलाईनद्वारे अर्ज करणे शक्य होणार नाही. यामुळे ती मुदत वाढवावी, शिवाय तहसीलदार कार्यालयाकडून उत्पन्न दाखले तातडीने मिळतील याची व्यवस्था करावी.
काही जणानी ऑनलाईनद्वारे अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली असली तरी आर. डी. नंबरमध्ये सावळा गोंधळ झाला आहे. गर्लगुंजीमधील तीन विद्यार्थ्यांना एकच आर. डी. क्रमांक मिळाला आहे. यामुळे शिष्यवृत्ती मिळण्यास तांत्रिक अडचण निर्माण होणार आहे. तहसीलदारांनी यामध्ये तातडीने लक्ष घालून प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आणावी, अन्यथा यासाठी पालक व विद्यार्थ्यांना आंदोलन होती घेण्याची वेळ निर्माण होईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
सदर निवेदन देताना गर्लगुंजी ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील, एसडीएमसी चेअरमन शंकर गोरे, पालक पुंडलिक मेलगे, अनिकेत कुंभार, तरुण मेलगे, ओमकार मेलगे, मंथन पाटील, समर्थ मेलगे, साईनाथ कुंभार यासह इतर उपस्थित होते.