जगदीश शिंदे यांचा उपक्रम : 25 सप्टेंबर रोजी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन
प्रतिनिधी /खानापूर
देश पातळीवरील खेळाचे महत्त्व ओळखून खानापुरातील क्रीडापटूंना वाव तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रीडापटू तयार करण्यासाठी येथील वायू दलातून निवृत्त झालेले जगदीश शिंदे यांनी (इलाईट रनिंग) अकॅडमी नावाचे प्रशिक्षण केंद्र सुरू केले आहे. याबाबत त्यांनी प्रशिक्षण केंद्रात बोलावलेल्या पत्रकार परिषदेत आपल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली.
वायुदलात दीर्घ पल्ल्याचा धावपटू म्हणून चमकदार कामगिरी केली आहे. माझ्या अनुभवाचा उपयोग नव तरुणाना व्हावा, यासाठी खानापूरसारख्या दुर्गम भागात प्रशिक्षण केंद्र सुरू करुन येथील क्रीडापटूंना राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तयार करण्याचा मानस ठेवून कोणताही व्यावसायिक दृष्टिकोन न ठेवता ही अकॅडमी सुरू केली आहे.
सध्या या अकॅडमीत 20 खेळाडू प्रशिक्षण घेत आहेत. मॅरेथॉन, क्रॉस कन्ट्री यासह इतर धावण्याच्या क्रीडा प्रकारतही धावपटू तयार करण्याचा एकमेव उद्देश ठेवून ही अकॅडमी सुरू करण्यात आली आहे.
स्पर्धकांना उत्तेजन देण्यासाठी सप्टेंबर 25 रोजी खानापुरात देशपातळीवर अर्ध मॅरेथॉन 21 कि. मी. स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी www.runindia.in या संकेत स्थळावर आपली नावे नेंदवावी, असे आवाहन जगदीश शिंदे यांनी केले.