देवाप्पा गुरव यांच्या अध्यक्षतेखाली म. ए. समितीची बैठक : येत्या सोमवारपर्यंत बैठकीची तारीख निश्चित करणार, दोन्ही गटातून एकीचा सुर
वार्ताहर /खानापूर
बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीत एकीचा सुर समोर आल्याने आता मराठी माणसात नवचैतन्य निर्माण होताना दिसत आहे. याच धर्तीवर खानापूर तालुक्मयातही महाराष्ट्र एकीकरण समितीच्या दोन्ही गटात एकीचा सुर समोर आला आहे. गेल्या ऑगस्ट महिन्यात माजी आमदार दिगंबर पाटील यांच्या सहीनिशी एकीसाठीचा पत्रव्यवहार समितीचे अध्यक्ष देवाप्पा गुरव यांच्याशी करण्यात आला होता. त्यानुसार खानापूर तालुका म. ए. समितीत एकी करण्यासाठी तारीख व वेळ तसेच ठिकाण अध्यक्ष देवाप्पा गुरव यांनी जाहीर करावे. आम्ही कधीही एकीला तयार आहोत, असे पत्र दिले होते. पण या संदर्भात समितीच्या बैठकीतून कोणतेही प्रत्युत्तर देण्यात आले नव्हते. परंतु सोमवारी झालेल्या बैठकीत एकीच्या प्रस्तावासंदर्भात चर्चा करण्यात आली. व माजी आमदार दिगंबर पाटील यांनी पत्राद्वारे केलेल्या आवाहनाचा आदर राखून समितीत दुभंगलेल्या दोन गटात एकीची चर्चा घडवून आणण्यासाठी येत्या सोमवारपर्यंत तारीख निश्चित करून तसे पत्र समितीचे अध्यक्ष माजी आमदार दिगंबर पाटील यांना देण्यात यावे, असा ठराव करण्यात आला.
सोमवारी येथील शिवस्माकात झालेल्या म. ए. समितीच्या कार्यकारिणीच्या बैठकीत हा ठराव घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी देवापा गुरव होते. प्रारंभी सचिव गोपाळराव देसाई यांनी उपस्थितांचे स्वागत करून बैठकीतील उद्देश मांडला. प्रामुख्याने सोमवारी झालेली बैठक खानापूर तालुका म. ए. समितीच्या दुभंगलेल्या दोन गटात एकीसाठी आलेल्या प्रस्तावावर चर्चा करणे, विधान परिषद निवडणुकीत समितीची भूमिका काय घ्यावी तसेच मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांच्या निवडीबद्दल सत्कार संदर्भात बैठक बोलावण्यात आली होती. यानुसार बैठकीत चर्चा करण्यात आली. यामध्ये विधानपरिषद निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्यांना मतदानासाठी मत स्वातंत्र्य देण्याचा ठराव करण्यात आला. तसेच बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या महाराष्ट्र राज्य मराठी भाषा प्राधिकरण समितीवर खानापूर येथील मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर यांची महाराष्ट्र सरकारने निवड केल्याने त्यांचा शाल, श्रीफळ देऊन समिती कार्यकारिणीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चेत समितीत एकीची पावले उचलण्या संदर्भात प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या बैठकीत अनेकांनी आपले विचार मांडले. सर्वांच्या भाषणातून एकीचाच सुर समोर आला.
यावेळी गोपाळराव पाटील, निरंजन सरदेसाई, तालुका पंचायत माजी सदस्य पांडुरंग सावंत, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, रणजीत पाटील, पी. एच. पाटील, माजी सभापती सुरेश देसाई, पुंडलिक पाटील, राजू पाटील, कृष्णकांत बिर्जे, कृष्णा कुंभार, रवींद्र शिंदे, राजू लक्केबैलकर, रामचंद्र गावकर, सदानंद पाटील आदिनी विचार मांडले. या बैठकीला रवी पाटील, सूर्याजी पाटील, दत्तू कुटे, भूपाल पाटील यासह अनेकजण उपस्थित होते.
मराठीच्या बळकटीसाठी प्रयत्न करणार – नारायण कापोलकर
यावेळी मराठी सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष नारायण कापोलकर सत्काराला उत्तर देताना म्हणाले, महाराष्ट्र राज्य मराठी भाषा प्राधिकरणाच्या सदस्यपदी झालेली आपली निवड ही सीमाभागात मराठीसाठी मराठी संस्कृती प्रतिष्ठानच्या माध्यमातून केलेल्या चळवळीचे सार्थक आहे. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या सहकार्यातून वाचनालय, मराठी शाळांची अभिवृद्धी, स्पर्धात्मक परीक्षा असे अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. या उपक्रमाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने ही निवड केली आहे. सीमाभागात अजूनही मराठी भाषेचे जतन व भाषेचे महत्त्व वाढवण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असून नोंदणीकृत मराठी संघ-संस्थांसाठी सहाय्यधन मिळवून घेण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे विचार त्यांनी यावेळी मांडले. या बैठकीत त्यांनीही समितीच्या दोन्ही गटानी लवकरात लवकर एकी करून खानापूर तालुक्मयात एक आदर्श निर्माण करावा, असे आवाहन केले.