प्रतिनिधी / खानापूर
येथील डीकेएफसी फुटबॉल क्लबने 6+2 फुटबॉल स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेचा अंतिम सामना डीसायडर्स विरुद्ध अमझा एफसी बेळगाव संघात होऊन त्यामध्ये पेनल्टी शुटआऊटवर डिसायडर्स संघाने विजय मिळवून जेतेपद पटकावले. स्पर्धेत खानापूर, बेळगाव, हुबळी, दांडेली, कॅसलरॉक येथील फुटबॉल संघांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेचा बक्षीस समारंभ तालुका क्रीडांगणावर महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठल हलगेकर, नगरसेवक विनायक कलाल, नगरसेवक विनोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक बसगौडा पाटील, तालुका भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, रवि काडगी, कमल जैन, पंडित ओगले, शिवा मयेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी डीकेएफसी फुटबॉल क्लबच्यावतीने विठ्ठल हलगेकर, विनायक कलाल व बसगौडा पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. सदर स्पर्धा पाहण्यासाठी दोन दिवस तालुका क्रीडांगणावर फुटबॉल शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. स्पर्धेत उत्कृष्ट खेळाडू डिसायडर्स संघाचा संतोष तर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून मोसीन (अमझा एफसी संघ) यांना विशेष बक्षीस देण्यात आले. तर या स्पर्धेत खानापूरच्या रिव्हेनजर्स एफसी संघातून विजय पाटील या 16 वर्षीय खेळाडूने उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केल्याबद्दल त्यालाही सन्मानित करण्यात आले. या शिवाय बेस्ट पासर म्हणून डीसायडर्स संघाचा चरण तसेच उत्तम संघ म्हणून मन्सापूर एफसी यांना सन्मानित करण्यात आले. दिवस-रात्र झालेली ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी दिनेश खणगावकर, महादेव काद्रोळकर, अवधूत बेंद्रे, सुधीर माळगी, प्रभाकर चिनवाल, अनिकेत पाटील, रुपेश हडीलगेकर, आदेश सडेकर, महेश सुंठकर, सानेश पाटील, किरण खणगावकर, नगरसेवक विनोद पाटील, आकाश हट्टीकर, स्वप्नील कौंदलकर, शुभम आंबेवाडकर, आकाश पाटील, वैभव साबळे व इतर अनेकांनी विशेष प्रयत्न केले.