प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहरातून पोलीस प्रशिक्षण केंद्राला जाणाऱया रस्त्यावरील नाल्यावरील ब्रिटिशकालीन पुलाला भगदाड पडले आहे. यामुळे या पुलावरून होणारी चार चाकी वाहतूक बंद करण्यात आली असून केवळ दुचाकी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे.
सध्याच्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीमध्ये ब्रिटिश काळात सरकारी मद्यार्क निर्मिती कारखाना होता. त्या कारखान्याला जाण्या-येण्यासाठी रस्त्यावर येणाऱया कुंभार नाल्यावर दगडी पूल बांधण्यात आला आहे. तो पूल शंभर वर्षांपूर्वीचा असावा. पण तो पूल आणि उर्वरित रस्ता जोडण्यासाठी दोन्ही बाजूला दगडी संरक्षक भिंत बांधून मध्यभागी भरती घालून रस्ता करण्यात आला आहे. त्या रस्त्यावरील पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या बाजूने मध्यभागीच जवळपास दोन-अडीच फूट व्यासाचे भगदाड पडले आहे. भरतीची माती सरकल्याने ते भगदाड पडले आहे. शनिवारी रात्री 9 च्या सुमारास नेहमीप्रमाणे लोक त्या ठिकाणी फिरत असताना भगदाड पडल्याचे दिसून आले. भगदाड पडताच कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी बॅरिकेड्स घालून पुलावरील रस्ता बंद ठेवण्यात आला आहे. केवळ दुचाकी वाहतूक सुरू आहे. सदर पूल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारित येत असल्याने कोणताही धोका निर्माण होऊ नये, यासाठी पडलेले भगदाड काँक्रीटने बुजवून तो पूल वाहतुकीला खुला ठेवणे गरजेचे आहे. कारण पोलीस प्रशिक्षण केंद्र असल्याने त्या ठिकाणाहून वरिष्ठ पोलीस अधिकाऱयांच्या वाहनांची नेहमी ये-जा असते. केवळ भगदाड पडलेला भाग वगळता उर्वरित पूल मजबूत स्थितीत आहे. मात्र ते भगदाड वेळीच न बुजवल्यास त्याची व्याप्ती वाढण्याचा धोका आहे.