चुंचवाड येथे सिमेंट काँक्रिटीकरण रस्ता भूमिपूजनप्रसंगी आमदार डॉ. निंबाळकरांचे उद्गार
खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात अद्याप बरीच विकासकामे मार्गी लावावी लागणार आहेत. तरीदेखील शासनदरबारी पाठपुरावा करून बरीच विकासकामे मंजूर करून आणली आहेत. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच असते. पण एकदा निवडणूक निकाल लागला की सर्वांनी एकत्र येऊनच काम केले तर विकास द्रुतगतीने होऊ शकतो. यासाठी तालुक्याच्या सुधारणा कार्यात कोणतेही राजकारण नको, असे उद्गार आमदार डॉ. अंजली निंबाळकर चुंचवाड येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याच्या भूमिपूजन समारंभात बोलताना व्यक्त केले.
राज्य अल्पसंख्याक विकास योजनेतून चुंचवाडमधील अल्पसंख्याक वसाहतीमधील रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण कामासाठी आमदार अंजली निंबाळकर यांनी 56 लाखांचा निधी मंजूर करून आणला आहे. त्यामधून आता अल्पसंख्याक वसाहतीमधील संपूर्ण रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण होणार आहे. चुंचवाड येथे समुदाय भवन बांधण्यासाठीदेखील आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी 10 लाखांचा निधी मंजूर केला आहे. यावेळी ग्रामीण ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष मधू कवळेकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्षा गीता अंबडकट्टी, लिंगनमठ पंचायतीच्या अध्यक्षा रत्ना माटोळी, उपाध्यक्ष चिकोडी, तसेच ग्रा. पं. सदस्य भैरू मांडवी, पांडू पाटील, शिवानंद, राजू वायदंडे, फातिमा अरलवाड, काशीम हट्टीहोळी, मुस्ताक गास्तीकोप, बसवराज नाईक, शिवानंद बागेवाडी यासह चुंचवाड ग्रामस्थ उपस्थित होते.