त्या हॉटेल व्यवसायिकाचा अहवाल मृत्यूनंतर पॉझिटिव्ह
वार्ताहर / खानापूर
खानापूर शहरातील बेळगाव – पणजी महामार्गावर असलेल्या त्या हॉटेल व्यवसायिकाचा मंगळवारी संशयास्पद मृत्यू झाला होता. मृत्यूपूर्वी त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता. बेळगाव येथील बीम्स हॉस्पिटलमध्ये उपचार घेताना त्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला व त्यानंतर त्याचा घशातील द्राव तपासणीसाठी पुन्हा एकदा पाठविण्यात झाला होता. सदर अहवाल आज सकाळी आला असून तो कोरोना पॉझिटिव्ह होता असे स्पष्ट झाले आहे .त्यामुळे गुरुवारी दुपारी खानापूर तालुका प्रशासनाने त्या हॉटेल परिसरातील पन्नास मीटर दुतर्फा राष्ट्रीय महामार्ग सीलबंद केला आहे. नगरपंचायतीच्या तसेच पोलीस कर्मचाऱयांनी दुतर्फा बॅरिकेड्स लावून या भागाला सीलडाउन केले आहे. खानापूर तालुक्यात गेल्या तीन महिन्यात करवीनकोप येथील त्या सैनिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर धास्ती निर्माण झाली होती परंतु आता खानापूर शहरातच पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळला आणि त्याचा मृत्यूही झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे खानापूर शहरात आता धास्ती निर्माण झाली आहे.