खानापूर / प्रतिनिधी
खानापूर तालुक्यात गुरुवारी आणखी पाच कोरोना बाधितांची भर पडली आहे. ते पाचही रुग्ण पुरुष असून त्यापैकी तालुक्यातील बेकवाड गावात एक 54 वर्षीय एक 30 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. तर खानापूर शहरातील 47 वर्षीय व्यक्तीलाही कोरोना झाल्याचे बुलेटिनमध्ये प्रसिद्ध झाले आहे. मात्र तो रुग्ण खानापूर शहरातील नेमक्या कोणत्या गल्लीत राहतो याचा मात्र पत्ता देण्यात आला नाही. तर खानापूर शहरातीलच पोलीस क्वॉटर्समधील 51 वर्षीय पुरुषाला कोरोना झाला असून बिडीजवळील हंदूर गावातील मारुती गल्लीत राहणाऱया 45 वर्षीय पुरुषालाही कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे आता तालुक्यात कोरोना बाधितांची संख्या 279 वर पोहोचली आहे.