गंदीगवाड येथील सहा वर्षाच्या बालकाला लागण, अन्य एक बेंगलोरस्थीत खानापूरवासीय
चापगाव / वार्ताहर
खानापूर तालुक्यात सलग चौथ्या दिवशीही कोरोना पॉझिटिव्हचा वाढता आकडा आलेला आहे. रविवारच्या अहवालात खानापूर तालुक्यात आणखी दोघांना पॉझिटिव्ह आल्याची नोंद झाली आहे. यामध्ये खानापूर तालुक्यातील गंधीगवाड येथील एका सहा वर्षीय बालकाला कोरोनाची लागण झाली आहे.
सदर बालक पॉझिटिव्ह कसा आला याचा तपास प्रशासनाने हाती घेतला आहे. प्राथमिक अंदाजानुसार करविनकोप येथील त्या जवानाच्या संपर्कात आलेल्या एखाद्या नातेवाईकाच्या संपर्कातून त्या बालकाला कोरोना झाला असावा, असे समजते. तर दुसरा आणखी एक व्यक्ती मूळचा खानापूरचा असून तो बेंगलोर येथे एका कंपनीत कामाला आहे. तो पॉझिटिव्ह आल्याचे समजते. सध्या तो बेंगलोरमध्येच आहे पण त्याचा पत्ता खानापुर असल्याने खानापूरच्या अहवालात त्याची नोंद झाली आहे. शिवाय कसबा नंदगड येथील एकाला लागण झाल्याची चर्चा शनिवारी झाली होती. तालुक्मयात कोरोना पॉझिटिव्हचा वाढता आकडा सुरू असून खानापूर तालुक्मयाच्या यादीत आतापर्यंत सहा जणांना लागण झाल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात बाधितांची संख्या वाढत असल्याने भीती निर्माण झाली आहे.