प्रतिनिधी / खानापूर
खानापूर येथील न्यायालयाच्या सुसज्ज अशा पहिल्या मजल्याचे उद्घाटन शनिवार दि. 30 रोजी सायंकाळी 4.30 वाजता कर्नाटक उच्च न्यायालयाचे प्रशासकीय न्यायाधीश अरविंदकुमार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर एम. जोशी तसेच प्रमुख अतिथी म्हणून कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायाधीश सचिन एस. मगदूम, खानापूरचे न्यायाधीश पी. मुरली मोहन रेड्डी व सार्वजनिक बांधकाम खात्याचे कार्यकारी अभियंते संजीवकुमार ए. बुलकाई उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खानापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड. आय. आर. घाडी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी ते म्हणाले, नव्याने बांधलेल्या न्यायालयाच्या पहिल्या मजल्यावर तीन सुसज्ज कोर्ट हॉल, पक्षकारांना बसण्याची स्वतंत्र व्यवस्था तसेच महिला व लहान मुलांना बसण्यासाठी प्रतीक्षालयाची सोय करण्यात आली आहे. तसेच समझोता केंद्रासाठी देखील सदर मजल्यावर स्वतंत्र हॉलची व्यवस्था केली आहे. या शिवाय स्वच्छतागृहाचीही सोय केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
न्यायालयातील वाढत्या खटल्यांमुळे ताण वाढला आहे. अशा परिस्थितीत सध्या असलेली इमारत अत्यंत कमी पडत होती. यामुळे बार असोसिएशनसाठी असलेला हॉलही न्यायालयासाठी देण्यात आला होता. पण आता तिन्ही न्यायालयांची पहिल्या मजल्यावर स्वतंत्र व्यवस्था झाल्याने बार असोसिएशनचा हॉलदेखील वकील वर्गाला वापरण्यासाठी मिळणार आहे. यामुळे बार असोसिएशनसाठी आवश्यक असलेल्या इतर सोयी-सवलतीची व्यवस्था करणे सोयीचे झाले आहे.
प्रांताधिकारी न्यायालयाचीही सोय
खानापूरला यापूर्वी प्रांताधिकारी न्यायालयाची सोय नव्हती. यामुळे आरटीएस अपील व जमिनीसंदर्भातील इतर दाव्यांसाठी पक्षकारांना बेळगावला जावे लागत होते. यामुळे खानापुरात प्रांताधिकाऱयांचे न्यायालय व्हावे, अशी बऱयाच दिवसांची मागणी होती. यासाठी खानापूर बार असोसिएशनच्या माध्यमातून प्रयत्न केले जात होते. आता त्या प्रयत्नांना यश आले असून खानापूरच्या तहसीलदार कार्यालयात यापुढे महिन्यातून दोनवेळा प्रांताधिकाऱयांच्या न्यायालयाचे कामकाज चालणार आहे. प्रांताधिकाऱयांसमोरील दाव्यांसाठी बेळगावला जाण्याची आवश्यकता लागणार नाही, अशी माहिती घाडी यांनी दिली.