खानापूर / प्रतिनिधी
कर्नाटक राज्यातील नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आरक्षणाला उच्च न्यायालयाने पुढील निर्णयापर्यंत स्थगिती दिल्याने बुधवार दि. 21 रोजी जाहीर झालेली खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाची निवडणूकही आता पुढे ढकलण्यात आली आहे. या संदर्भात नगरपंचायतीने निवडणूक स्थगित झाल्याची नोटीस सर्व नगरसेवकांना दिली आहे.
यापूर्वी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाचे आरक्षण दोन वेळा जाहीर झाले होते. पण दोन्ही वेळा राज्यातील नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष आरक्षणाचा वाद न्यायालयात गेल्याने स्थगिती मिळाली होती. यानंतर दोन वेळा उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर आरक्षण जाहीर झाले. पण दोन्ही वेळा वाद उच्च न्यायालयात गेल्याने नगरपंचायतीची निवडणूक होऊन 25 महिने लोटले तरी नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाची निवडणूक झाली नाही. उच्च न्यायालयाने दुसऱया वेळी दिलेल्या निकालानंतर 15 दिवसांपूर्वी नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाचे पुन्हा आरक्षण जाहीर झाले. त्यानुसार खानापूचे नगराध्यक्षपद सामान्यासाठी तर उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी राखीव आले होते. यानंतर निवडणुकीचा कार्यक्रमही जाहीर झाला. त्यामध्ये नगराध्यक्षपदासाठी बऱयाच राजकीय हालचालीही झाल्या. उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आल्याने या जमातीच्या एकमेव नगरसेविका लक्ष्मी अंकलगी यांचे उपनगराध्यक्षपद निश्चित झाले होते. नगराध्यक्ष पदासाठी निर्माण झालेली गटबाजी टाळून एकमताने निवड व्हावी, यासाठी पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्या प्रयत्नाला यश आले असतानाच सोमवारी उच्च न्यायालयाने नगरपंचायत नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाच्या आरक्षणाला पुढील आदेशापर्यंत पुन्हा एकदा स्थगिती दिल्याने खानापूर नगराध्यक्ष-उपनगराध्यक्षपदाची निवडणूक रखडली आहे.