प्रतिनिधी/ खानापूर
खानापूर नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. आता ही निवडणूक बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्या दिवशी सकाळी 10.30 ते 1 यावेळेत उमेदवारी अर्ज भरण्याची वेळ देण्यात आली आहे. यानंतर लगेचच उमेदवारी अर्जांची छाननी व दुपारी 3 वाजता निवडणुकीसाठी मतदान होणार आहे.
खानापूर नगराध्यक्षपद सामान्य तर उपनगराध्यक्षपद अनुसूचित जमाती महिलेसाठी ठेवण्यात आले आहे. खानापूर नगरपंचायतीची निवडणूक 31 ऑगस्ट 2018 रोजी झाली होती. तर निवडणूक निकाल 3 सप्टेंबर 2018 रोजी लागला होता. पण गेले 25 महिने वेगवेगळय़ा कारणांमुळे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली नव्हती. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्याने आता नगरसेवकांमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.