प्रतिनिधी /खानापूर
येथील नव्या पुलाजवळ असलेल्या मोक्षधाम स्मशानभूमीच्या मार्गावर पेव्हर्स बसविण्याच्या कामाला सोमवारी प्रारंभ झाला. या मार्गापैकी अर्ध्या मार्गावर या पूर्वीच पेव्हर्स बसविण्यात आले होते. पण जवळजवळ 70 मीटर लांबीच्या मार्गावर पेव्हर्स बसवावेत, अशी बऱयाच दिवसांपासून मागणी करण्यात येत होती.
या मागणीची दखल घेऊन नगरपंचायतीने या कामासाठी 4 लाख रुपये अनुदान मंजूर केले होते. त्या अनुदानातून पेव्हर्स बसविण्याच्या कामाचा शुभारंभ नगराध्यक्ष मजहर खानापुरी, स्थायी कमिटी अध्यक्ष लक्ष्मण मादार, नगरसेवक प्रकाश बैलूरकर, नगरसेवक नारायण ओगले यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक विलास मोरे, अमृत पाटील, निलेश सडेकर, प्रदीप दलाल, रामा बहादूर यासह नगरपंचायतीचे कर्मचारी व कंत्राटदार उपस्थित होते. आता संपूर्ण रस्त्यावर पेव्हर्स बसविण्याचे काम पूर्ण होणार आहे.
भिंती मजबूत-छप्पर धोकादायक मुख्य मोक्षधाम इमारतीचे लाकडी छप्पर व कौलेही खराब झाली आहेत. यामुळे मोक्षधामच्या भिंती मजबूत असल्या तरी छप्पर धोकादायक असल्याने ते संपूर्णतः काढून नवीन छप्पर बनवावे, अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली. नगराध्यक्ष, स्थायी कमिटी अध्यक्ष व नगरसेवकांनी याची प्रत्यक्ष पाहणी केली. यासंदर्भात योग्य क्रम घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले.