खानापूर / बातमीदार
खानापूर येथील जनावरांचा बाजार कोरोना व पावसामुळे काही महिने बंद होता. त्यामुळे जनावर मालकांनी आपली जनावरे खरेदी-विक्रीसाठी बाजाराच्या ठिकाणी आणली नव्हती. रविवारी खानापूरचा आठवडी बाजार असल्याने दोन बैलजोडय़ा बाजारात विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या.
खानापूर तालुक्मयात खानापूर व बिडी येथे जनावरांचा बाजार भरतो. रविवारी खानापुरात तर शनिवारी बिडी येथे बाजार भरतो. दोन्ही ठिकाणचे बाजार काही महिने बंद ठेवण्यात आले होते. त्यामुळे जनावरांची खरेदी-विक्री थांबली होती. भाताची सुगी आता अंतिम टप्प्यात आहे. शेत नांगरणीसाठी बैलांची आवश्यकता आहे. ऊस पिकात नांगरणी करण्यासाठी बैलजोडीची आवश्यकता आहे. त्यामुळे जनावरांचा बाजार सुरू व्हावा, असा अभिप्राय काही शेतकऱयांतून केला जात होता.
त्यानुसार खानापूरचा जनावरांचा बाजार सुरू झाला आहे. हा बाजार सुरू झाल्याचे अनेक शेतकऱयांना माहिती नव्हते. त्यामुळे या बाजाराकडे म्हणावे तसे जनावर मालक व शेतकरी फिरकले नव्हते. परंतु आज रविवार आठवडी बाजार असल्याने खानापूरच्या जनावरांच्या बाजारात सकाळपासून दोन बैलजोडय़ा विक्रीसाठी दाखल झाल्या होत्या. खरेदीदार मोजकेच उपस्थित राहिल्याने बैलजोडय़ांची खरेदी-विक्री होऊ शकली नाही. खानापूर-पणजी या हमरस्त्याशेजारीच खानापूरचा बाजार भरत असल्याने रस्त्यावरून ये-जा करणाऱया शेतकऱयांना जनावरांचा बाजार भरल्याचे दृष्टीस पडले. त्यामुळे या पुढील काळात हळूहळू का होईना जनावरांचा बाजार जोमाने सुरू होणार असल्याचे दिसून येते.