लक्ष विचलित करून पावणे पाच लाखाचे दागिने लंपास, क्राईम ब्रँचचे पोलीस असल्याचे सांगून केली फसवणूक
प्रतिनिधी / बेळगाव
आपण क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, अशी बतावणी करून पल्सर मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी वृद्ध दाम्पत्याला लुटल्याची घटना रविवारी दुपारी आरपीडी क्रॉस (खानापूर रोड) पासून हाकेच्या अंतरावर घडली आहे. गजबजलेल्या ठिकाणी वृद्ध दाम्पत्याजवळील 4 लाख 71 हजार 700 रुपये किमतीचे दागिने भामटय़ांनी लांबविले आहेत.
या घटनेने एकच खळबळ माजली आहे. घटनेची माहिती समजताच टिळकवाडीचे पोलीस निरीक्षक नूर अहमद व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी धाव घेतली. भामटय़ांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. या परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासून त्यांचा शोध घेण्यात येत असून दागिने लुटल्यानंतर भामटय़ांनी मोटारसायकलवरून तेथून पलायन केले आहे.
खानापूर रोड टिळकवाडी येथील प्रमिला मलगौंडा पाटील (वय 70) व त्यांचे पती मलगौंडा रामगौंडा पाटील (वय 80) या वृद्ध दाम्पत्याची लूट झाली आहे. रविवारी दुपारी पावणे दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. प्रमिला व मलगौंडा हे दोघे किराणा सामान आणण्यासाठी आरपीडीजवळील एका सुपरमार्केटला जात होते. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या दोघा भामटय़ांनी त्यांना अडवून हे कृत्य केले आहे. या वृद्ध दांपत्याला अडवून आपण क्राईम ब्रँचचे पोलीस आहोत, असे सांगत त्यांना ओळखपत्र दाखविण्यात आले.
चार दिवसांपूर्वी या परिसरात एक खून झाला आहे. खुनानंतर अंगावरील दागिने पळविण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत अंगावर दागिने घालून जाणे धोक्मयाचे ठरणार आहे. त्यामुळे तुमच्या सुरक्षिततेसाठी दागिने काढून द्या, असे भामटय़ांनी सांगितले. त्यावेळी प्रमिला यांनी आपल्या हातातील 106 ग्रॅमच्या सहा बांगडय़ा भामटय़ांच्या हातात ठेवल्या.
बांगडय़ा हातात येताच भामटय़ांनी प्रमिला यांच्या पिशवीत त्या टाकल्याचे भासविले व त्यांच्या गळय़ात 30 ग्रॅमचे मंगळसूत्र होते. ते सुद्धा काढून द्या, अशी मागणी केली. त्यावेळी मंगळसूत्र बाजूला काढण्यास प्रमिला यांनी नकार दिला. तोपर्यंत या परिसरातील गर्दी वाढू लागली. गर्दी वाढताच पल्सरवरून भामटय़ांनी तेथून पळ काढला. भामटे गेल्यानंतर प्रमिला यांनी आपल्या पिशवीत सोन्याच्या बांगडय़ा आहेत का, याची पाहणी केली. त्यावेळी पिशवीत बांगडय़ा नव्हत्या. आपण फसलो गेलो, हे त्यांच्या लक्षात आले.