वार्ताहर / खारेपाटण:
खारेपाटण बंदरगाव येथून 31 जानेवारी रोजी बेपत्ता झालेल्या श्रीमती आयशाबी हुसेन सारंग (78) यांचा मृतदेह खारेपाटण येथील घोडे पाथर बंदरानजीक सुखनदीच्या पात्रामध्ये आढळून आला.
31 जानेवारीला सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून श्रीमती आयशाबी सारंग बेपत्ता झाल्या होत्या. सारंग कुटुंबियांनी त्यांचा आजूबाजूला शोध घेण्याचा प्र्रयत्न केला. नातेवाइकांकडेही चौकशी करण्यात आली. परंतु त्यांचा कुठेच शोध लागला नाही. त्यामुळे इरफान सारंग यांनी आयशाबी बेपत्ता असल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती. 3 फेब्रुवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास ग्रामस्थांना सदर वृद्धेचा मृतदेह खारेपाटण घोडे पाथर बंदर येथील नदीपात्रामध्ये आढळून आला. या संदर्भात पोलिसांना कळविण्यात आले असता पोलीस उपनिरीक्षक ए. एस बनकर, पोलीस हवालदार ए. ए. रावराणे व पोलीस कॉन्स्टेबल साबळे घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या मदतीने सदर मृतदेह बाहेर काढून पोलिसांनी पंचनामा केला. श्रीमती आयशाबी या नदीपात्रामध्ये घसरून पडल्याल्या असाव्यात, असा प्र्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.