चालकासह दोघे ताब्यात : ट्रकही जप्त
वार्ताहर / खारेपाटण:
महामार्गावरील खारेपाटण चेक पोस्टवर शनिवारी पहाटे 5.30 वा. च्या दरम्यान गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारा ट्रक पकडण्यात आला. एकूण 75 हजार 600 रुपयांचे दारूचे 18 बॉक्स वा ट्रक मिळून साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कणकवली व खारेपाटण पोलिसांनी खारेपाटण चेकपोस्ट येथे संयुक्तरित्या ही कारवाई केली.
सध्या देशभरात चालू असलेल्या लॉकडाऊनच्या अनुषंगाने व जिल्हांतर्गत सीमा बंदीमुळे खारेपाटण चेकपोस्ट येथे पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतर गाडय़ांना मज्जाव करण्यात येत आहे. परंतु शनिवारी पहाटे कणकवलीहून खारेपाटणकडे येणाऱया भरधाव ट्रकला खारेपाटण चेकपोस्ट येथे अडविण्यात आले. सदर ट्रक चालकाकडे विचारणा केली असता बिस्किटे व तेलाचे बॉक्स गोवा येथे पोहोच करून आल्याचे चालकाने सांगितले. परंतु पोलिसांनी ट्रकची झडती घेतली असता ट्रकच्या हौद्यामध्ये गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली.
ट्रक चालक अजितकुमार सिंग (35, रा. कोलाड, तालुका रोहा, जिल्हा रायगड, मूळगाव जलालपूर, उत्तरप्रदेश) आणि दिलीप राया नाईक (48, तालुका रोहा, जिल्हा रायगड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे, पोलीस कॉन्स्टेबल के. के. मेथे, पोलीस हवालदार एन. एस. खाडे, श्री. सुर्वे व श्री. सावंत, ए. ए. रावराणे, यु. यु. साबळे, एस. एस. पोकळे, कृषी अधिकारी एस. डी. जाधव व आरोग्य विभाग सहाय्यक लिपीक संकेत शेटये आदी उपस्थित होते. r