दोनदिवसीय देशव्यापी संप : बेळगावमध्ये काढण्यात आला मोर्चा
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करण्यात येत असल्याने बँक कर्मचारी संघटनांनी दोनदिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. सोमवारी संपाच्या पहिल्याच दिवशी बेळगावमध्ये बँक कर्मचाऱयांनी भव्य मोर्चा काढून खासगीकरणाला विरोध दर्शविला. मोर्चामध्ये बेळगाव शहरासह जिल्हाभरातील बँकांचे कर्मचारी सहभागी झाले होते.
नुकत्याच झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी काही राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करणार असल्याचे सांगितले होते. केंद्र सरकार आर्थिक उत्पन्न देणाऱया राष्ट्रीयकृत बँकांचे खासगीकरण करून जबाबदारी झटकत आहे. बँकांचे खासगीकरण झाल्यानंतर त्यामध्ये काही व्यक्तींचीच मक्तेदारी असल्याने अनेक बँका लयाला गेल्या आहेत. त्यामुळे बँकांचे खासगीकरण खपवून घेतले जाणार नाही. ग्राहकांनी विश्वासाने ठेवलेली रक्कम लुटण्याचा हा प्रकार आहे. गुंतवणूकदारांच्या व्याजावर हा हल्ला आहे. त्यामुळे बँकांचे खासगीकरण खपवून घेतले जाणार नाही, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
धर्मवीर संभाजी चौक येथे सोमवारी सकाळी सर्व बँकांचे कर्मचारी एकवटले. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली बेळगाव परिसरातील बँक कर्मचारी व अधिकारी सहभागी झाले होते. तेथून कॉलेज रोडमार्गे राणी चन्नम्मा चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला. यामध्ये केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. खासगीकरणाला कर्मचाऱयांचा तीव्र विरोध असल्याच्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या.
मंगळवारी करणार निदर्शने
संपाच्या दुसऱया दिवशी मंगळवार दि. 16 रोजी बेळगाव परिसरातील बँक कर्मचारी निदर्शने करणार आहेत. सकाळी 10.30 वाजता धर्मवीर संभाजी चौक येथे ही निदर्शने करण्यात येणार आहेत. राष्ट्रीयकृत बँक कर्मचाऱयांनी यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनतर्फे करण्यात आले आहे.
खासगीकरण नकोच
आजवर अनेक खासगी बँका बुडाल्या आहेत. खासगीकरणाने काहीच भांडवलदारांची मक्तेदारी तयार होईल. खासगीकरण झाल्यास ग्राहकांच्या ठेवींना फटका बसणार आहे. त्यामुळे खासगीकरणाचा विचार सरकारने बंद करावा, अशी मागणी युनायटेड बँक फोरमचे अध्यक्ष एकनाथ गिंडे यांनी केली.