विक्रम-एस’ असे नामकरण ः श्रीहरिकोटा येथून अवकाशगमन
@ श्रीहरिकोटा / वृत्तसंस्था
भारताच्या पहिल्या खासगी अग्निबाणाचा अंतराळात दिमाखदार प्रवेश झाला आहे. भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) श्रीहरिकोटा या प्रक्षेपण केंद्रावरुन शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता हा अग्निबाण अवकाशात यशस्वीरित्या झेपावला. ‘स्कायरुट एअरोस्पेस’ या स्टार्टअप कंपनीने या अग्निबाणाची निर्मिती केली आहे. या अभियानाला ‘मिशन प्रारंभ’ असे नाव देण्यात आले आहे.
हा प्रायोगिक उपक्रम होता. पेलोडसह या अग्निबाणाचे वजन 83 किलो होते. प्रक्षेपणानंतर तो साधारणतः पावणेपाच मिनिटांमध्ये 81.5 किलोमीटरच्या उंचीवर पोहचला. नंतर श्रीहरिकोटापासून 115.6 किलोमीटर अंतरावर तो बंगालच्या उपसागरात कोसळला. त्यावरील तीन उपग्रह त्याने यशस्वीरित्या अवकाशात पूर्वनिर्धारित उंचीवर प्रस्थापित केले. हे उपग्रह अनुक्रमे किडझ् इंडिया, बेझूमाप् अर्मेनिया आणि एन-स्पेसटेक इंडिया यांचे असून त्यांच्यावर सेन्सर्स बसविलेले आहेत. या उपग्रहांचा उपयोग प्रवेग, दाब इत्यादींच्या गणनेसाठी होणार आहे.
एका टप्प्यग्नाचे प्रक्षेपण
हा अग्निबाण एका टप्प्याच्या प्रक्षेपण क्षमतेचा असून घन इंधनावर उड्डाण करणारा होता. या अग्निबाणाची निर्मिती आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने करण्यात आली होती. यामध्ये कार्बन काँपोझिट संरचना आणि थ्री-डी प्रिंटेड साधने बसविण्यात आली आहेत. ‘विक्रम-एस’मुळे विक्रम मालिकेतील अनेक आधुनिक साधनांचे परीक्षण होणार आहे. प्रक्षेपणापूर्वी आणि प्रक्षेपणानंतर ज्या स्थित्यंतरातून हे तंत्रज्ञान जाणार आहे, त्याचेही अनुमान या पहिल्या प्रक्षेपणामुळे घेता येणार आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.
सर्व काही आधी ठरविल्याप्रमाणेच
हे अभियान यशस्वी झाल्यानंतर भारतीय राष्ट्रीय अवकाश प्रोत्साहन आणि प्राधिकार केंद्राचे अध्यक्ष पवन गोएंका यांनी प्रतिक्रिया दिली. या अग्निबाणाच्या सर्व व्यवस्था आधी ठरविल्याप्रमाणेच कार्य करीत आहेत. हा लघुकक्षेतील अग्निबाण होता. यानंतर भविष्यकाळात पूर्ण कक्षेपर्यंत जाण्याची क्षमता असणारे अग्निबाण निर्माण करण्याची तयारी करण्यात येईल. भारताच्या अवकाश क्षेत्रात हा नवा प्रारंभ आहे. हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण मानला जाणार आहे.
जितेंद्र सिंग उपस्थित
केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग या प्रक्षेपणाच्या प्रसंगी उपस्थित होते. हा एक नवा प्रारंभ आणि नवी पहाट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकाराने अवकाश क्षेत्रात खासगी क्षेत्राचा प्रवेश झाला आहे. भविष्य काळात खासगी क्षेत्राची या विभागात मोठी भागिदारी आणि योगदान असेल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
आम्ही इतिहास घडविला
अभियान यशस्वी झाल्यानंतर स्कायरुटचे प्रमुख कार्यकारी अधिकारी पवन कुमार चंदना यांनी समाधान व्यक्त केले. आम्ही इतिहास घडविला आहे. आम्ही भारताचा पहिला खासगी अग्निबाण सज्ज केला. हा नव्या युगाचा प्रारंभ आहे. यासाठी आम्ही इस्रो आणि इन-स्पेसचे आभारी आहोत, असेही ते म्हणाले. भविष्यकाळात असे आणखी अधिक शक्तिशाली अग्निबाण अवकाशात सोडले जातील. हा एक प्रतिष्ठित व्यवसाय म्हणून समोर येत असून त्यात भारताचेही मोठे योगदान असेल असे या कंपनीने आपल्या व्यक्तव्यात स्पष्ट केले आहे.