शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोर मौन सत्याग्रह
प्रतिनिधी/बेळगाव
खासगी विनाअनुदानित शाळा-कॉलेजकडे राज्य सरकारने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. 1995 नंतरच्या सर्व शाळा-कॉलेजना अनुदान मिळावे यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय खासगी विनाअनुदानित शाळा-कॉलेजच्या शिक्षकांनी केला आहे. मंगळवार दि. 23 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत शिक्षणमंत्री सुरेशकुमार यांच्या बेंगळूर येथील निवासस्थानासमोर तोंडाला काळी पट्टी बांधून मौन सत्याग्रह करण्यात येणार आहे.
अनुदानित शाळा-कॉलेजच्या शिक्षकांनी यापूर्वी अनेक आंदोलने केली आहेत. परंतु राज्य सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे. कोरोनाच्या काळात तर सर्व विनाअनुदानित शिक्षकांचे हाल झाले. समाज घडविणारा शिक्षकच पगाराविना आहे. 5 डिसेंबर 2020 पासून धारवाड येथे बसवराज होरट्टी यांच्या नेतृत्वाखाली 13 दिवस सत्याग्रह करण्यात आला. त्यावेळी राज्याचे कृषिमंत्री सी. सी. पाटील यांनी शिक्षकांच्या मागण्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पामध्ये अनुदानित शिक्षकांच्या कोणत्याच मागण्या पूर्ण करण्यात आलेल्या नाहीत.
राज्याचा अर्थसंकल्प पूर्ण होण्यापूर्वी सरकारने मागण्या मान्य कराव्यात, यासाठी मंगळवारी ‘चलो बेंगळूर’चा नारा देण्यात आला आहे. एक दिवस सत्याग्रहामध्ये अनुदानित व विनाअनुदानित शिक्षकांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी सर्व संघटनांचे पदाधिकारी, सर्व शिक्षक, शिक्षण संस्थांच्या पदाधिकाऱयांनी उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष एस. एस. मठद, जिल्हाध्यक्ष रामू गुगवाड व तालुका अध्यक्ष मारुती आजाणी यांनी केले आहे.