राज्य सरकारकडून आदेश जारी : 50 टक्के बेड राखीव ठेवण्याची सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असल्याने रुग्णांवर खासगी इस्पितळांमध्येही उपचार करण्याचा आदेश दिला आहे. खासगी इस्पितळांनी चिकित्सेसाठी आकारणी करावयाचा दर सरकारने निश्चित केला आहे. शिवाय वैद्यकीय महाविद्यालयांमधील इस्पितळे, खासगी इस्पितळांमध्ये कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी 50 टक्के बेड राखून ठेवण्याचा आदेश राज्य सरकारचे मुख्य सचिव टी. एम. विजयभास्कर यांनी दिला आहे.
सरकारच्या आरोग्य योजनेतील लाभार्थी, गरीब व आरोग्य खात्याने शिफारस केलेल्या रुग्णांवर एका दराचे पॅकेज आणि थेट इस्पितळांमध्ये दाखल होणाऱया रुग्णांवर उपचारासाठीचे स्वतंत्र पॅकेज घोषित करण्यात आले आहे. खासगी इस्पितळांकडूनही कोरोना रुग्णांवर उपचार सुरू झाल्यास सरकारी आरोग्य संस्थेवर पडणारा ताण काही प्रमाणात कमी होणार आहे.
बेंगळूर शहरांमधील सर्व 12 वैद्यकीय महाविद्यालयांनी देखील कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी तयार रहावे, असे आदेशपत्रकात नमूद करण्यात आले आहे. राज्य सरकारच्या सुवर्ण आरोग्य सुरक्षा ट्रस्टमार्फत नोडल एजन्सी म्हणून काम करणार आहे. राज्य सरकारने जारी केलेल्या दरपत्रकाप्रमाणे शुल्क आकारणी करण्यात यावी. त्यापेक्षा अधिक दर आकारणी केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
प्रामुख्याने बेंगळूर शहरात कोरोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात झाला आहे. त्यामुळे रुग्णांवर उपचारासाठी शहरातील कोविड इस्पितळांमध्ये बेडची कमतरता भासत आहे. त्यामुळे जनतेने खासगी इस्पितळांमध्येही उपचार करण्यासाठी चिकित्सेसाठी परवानगी द्यावी, अशी मागणी केली होती. मात्र, खासगी इस्पितळांमधून मनमानी वसुली होण्याची शक्यता असल्याने मुख्यमंत्री येडियुराप्पा यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी मंत्री आणि अधिकाऱयांची बैठक झाली. यावेळी खासगी इस्पितळांनी उपचारासाठी रुग्णांकडून आकारणी करावयाचा दर निश्चित करण्यात आला. याबाबत नेमलेल्या समितीने विविध खासगी इस्पितळ प्रमुखांशी चर्चा केल्यानंतर दर निश्चित करण्यात आला आहे.
आरोग्य खात्यामार्फत शिफारस केलेल्या रुग्णांसाठी दर :-
जनरल वॉर्डासाठी दिवसाला 5,200 रु.
एचडीयू वॉर्डासाठी 7,000 रु.
आयसीयु (विना व्हेंटिलेटर) 8,500 रु.
आयसीयु (व्हेंटिलेटरसह) 10,000 रु.
थेट खासगी इस्पितळांत दाखल होणाऱया रुग्णांसाठी दर :-
जनरल वॉर्डासाठी दिवसाला 10,000 रु.
एचडीयू वॉर्डासाठी 12,000 रु.
आयसीयु (विना व्हेंटिलेटर) 15,000 रु.
आयसीयु (व्हेंटिलेटरसह) 25,000 रु.