प्रतिनिधी/ रत्नागिरी
राज्यात व जिल्हयात सद्या कोविड 19 या आजाराचे रुग्ण संख्येत वाढ होत असुन कार्यक्षेत्रातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांशी नियमित समन्वय ठेवावा. कार्यक्षेत्रातील आरोग्य सेवक व आरोग्य सेविका यांनी दररोज खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांकडून सर्दी, ताप, खोकला, सारी यांची माहिती घ्यावी व दररोज वैद्यकीय अधिकारी यांना कळविण्याच्या सूचना जि.प. आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी दिल्या आहेत.
जिल्हय़ात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्या प्रतिबंधासाठी जिल्हा आरोग्य विभाग अलर्ट झालेला आहे. जिल्ह्य़ात सर्व वैद्यकीय यंत्रणेला खबरदारीचे आवाहन डॉ. कमलापूरकर यांनी केले आहे. ज्या भागात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. अशा परिसरात तात्काळ सर्वेक्षण केले जात आहे. ज्या भागात संबधित पॉझिटिव्ह रुग्णांचा वावर होत आहे, त्या पार्श्वभूमीवर संपर्कात असलेल्या लोकांची तपासणी केली जाऊन खबरदारीचे आवाहन आरोग्य कर्मचाऱयांमार्फत केले जात आहे. जिल्हय़ात कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची ऑनलाईन कार्यशाळा घेतली जावी असे डॉ. कमलापूरकर यांच्याकडून सांगण्यात आले आहे. सर्दी, ताप, खोकला या आजारांच्या उपचारासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांकडे येणाऱया रुग्णांची माहिती त्याच दिवशी इ-मेल व्दारे संबंधित वैद्यकीय अधिकारी यांना कळविणेबाबत सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांना कार्यशाळेव्दारे मार्गदर्शन करावे.
जेणेकरुन जनुकीय कार्यवाही करणे सोयीचे होईल व मृत्यू टाळता येण्यास मोलाची मदत होणार असल्याचे डॉ. कमलापूरकर यांनी सांगितले आहे. तालुका आरोग्य अधिकारी यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी यांचेसह कार्यक्षेत्रातील नर्सिंग होम्स ना भेटी देण्याच्या सूचनाही करण्यात आलेल्या आहेत. व त्या ठिकाणी आरटीपीसीआर कीटस् ठेवण्याचे सांगण्यात आले आहे. आरटीपीसीआर रॅट साठी साठी कर्मचाऱयांच्या डयुटी लावाव्यात. कोवीन ऍप वर माहिती भरणेसाठी डाटा एक्सेल शीट मध्ये भरुन त्याच दिवशी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्रांकडे पाठवावा. प्राथमिक आरोग्य केंद्रानी तो कोवीन ऍपवर भरावा असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर यांनी सांगितले आहे.