सांगली/प्रतिनिधी
सांगली महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना व्याजाने पैसे देवून यावर अव्वाच्याच्या सव्वा दराने व्याज वसुल करणाऱ्या खासगी महिला सावकारला चार दिवसापूर्वी अटक करण्यात आली होती. या अटक करण्यात आलेल्या खासगी सावकार सुवर्णा माणिक पाटील रा. महादेव मंदिराजवळ महसूल कॉलनी शामरावनगर सांगली हिच्याविरोधात आणखीन एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत धनवीर साहेबराव पानबुडे वय ३८ रा. वाघ गल्ली, खणभाग, सांगली यांनी ही तक्रार दिली आहे. पानबुडे यांच्याकडून एक लाख ८० हजाराच्या बदल्यात सात लाख २० हजाराची वसुली केली आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, खासगी सावकार सुवर्णा पाटील यांच्याविरोधात महापलिकेचा कर्मचारी कदम यांने जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी घेवून त्यांनी तात्काळ खासगी सावकारी सैल प्रतिबंधक विभागाला कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार पाटील या महिला सावकाराच्या घरावर छापा टाकला आणि तीला अटक केली होती. त्यावेळी या महिला सावकाराने प्रथम खासगी सावकारीचा परवाना घेतला आहे. पण परखान्याचा भंग करून तिने कोरे स्वाक्षरी असणारे धनादेश तसेच कोऱ्या उसनवार पावतीवर स्वाक्षरी घेणे कोरे बाँड घेणे, लोकांची वाहने तारण ठेवून घेणे असे प्रकार केले आहेत. ही सर्व कागदपत्रे मिळाली होती. तसेच यावेळी तिच्याकडून रोख २७ हजार २०० रूपये मोबाईल ज्युपिटर दुचाकी, अल्टो कार, अॅक्टीव्हा दुचाकी आणि वेगवेगळ्या लोकांच्याकडून घेतलेले कोरे धनादेश तसेच उसनवार पावत्या, कोरे बाँड मिळून आले हे सर्व साहित्य जप्त करण्यात आले होते.
या महिला खासगी सावकारविरोधात आणखीन कोणाच्या तक्रारी आहेत का असे आवाहन पोलीसांनी केले होते. या पोलीसांच्या आवाहनानुसार आता तक्रारी दाखल होत चालल्या आहेत. नवीन तक्रार दाखल केलेल्या पानबुडे यांनी या महिलेकडून एक लाख ८० हजार रुपये कर्ज घेतले होते आठवड्याला १० टक्के व्याजाप्रमाणे तिला आजअखेर सात लाख २० हजार रूपये परत दिले आहेत. पण तरीही ही महिला अद्यापही पानबुडे यांच्याकडे मुद्दल आणि व्याज असे मिळून दहा लाखाची मागणी करत होती त्यासाठी धमकी ही देत होती.