सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांचे निर्देश
प्रतिनिधी/ रत्नागिरी
खासगी रुग्णालयांकडून कोरोनाबाधितांची बिल आकारणीत मोठी लूट होत असल्याची बाब शासनाच्या निदर्शनास आली आहे. ही लूट थांबवण्यासाठी कडक नियम करण्यात आले आहेत. जिह्यातील काही रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले घेतली जात असल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यावर नियंत्रण राहण्यासाठी ऑडिटरची नेमणूक करण्याच्या सक्त सूचना सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) यांनी दिल्या आहेत. ऑडिटरने तपासल्यानंतरच रुग्णांकडून बिल घेतले जावे, असे निर्देश दिले आहेत.
खासगी हॉस्पिटलच्या बिलांबाबत कोल्हापूरप्रमाणे रत्नागिरीतही अंमलबजावणी करण्यात यावी. राज्यात सर्वत्र अंमलबजावणी होत असताना रत्नागिरीत ऑडिटरच नेमला गेला नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी तीव्र नाराजीही व्यक्त केली. कोरोना उपचारासाठीच्या खासगी रुग्णालयात बिले तपासणीसाठी ऑडिटर नेमा. त्यांनी तपासणी केल्याशिवाय बिले घेतली जाऊ नयेत, असे रत्नागिरी जिल्ह्य़ातील कोरोना स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सार्वजनिक राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
शुक्रवारी पाटील हे रत्नागिरीत आले होते. त्यांनी येथील अधिकाऱयांकडून कोरोना स्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी कोरोना परिस्थितीत शासकीय यंत्रणा सक्षम करण्याबाबत अधिकाऱयांना सूचना केल्या. जिह्यात कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक असून यामध्ये कोमॉर्बिड रुग्णांचा व वेळेत उपचारासाठी दाखल न झालेल्यांचा समावेश असल्याचे पाटील यांनी सांगितले. जिह्याचा मृत्यूदर साडेतीन टक्के असून येत्या 2 आठवडय़ात हा दर कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना आरोग्य यंत्रणेला त्यांनी दिल्या. जिह्यातील बरे होण्याचे प्रमाण चांगले आहे. आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्याचे आश्वासन पाटील यांनी यावेळी दिले.
कोरोनासाठी लागणाऱया औषध पुरवठय़ाचा आढावा देताना जिह्यात आलेल्या रेमीडीसीव्हरच्या 1295 पैकी 365 इंजेक्शन्स शिल्लक असल्याचे पाटील यांनी सांगितले. ऑक्सिजनची व्यवस्था असलेल्या बेडची पुरेशी संख्याही आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयातील सीटीस्पॅन करणाऱया रुग्णांना प्रिंट काढण्यासाठी खासगी ठिकाणी जावे लागू नये. कोरोनासह अन्य रुग्णांनाही सिटीस्पॅन मोफत द्यावे, असे त्यांनी सांगितले. रत्नागिरीतील कोरोना तपासणी प्रयोगशाळेला तांत्रिक मान्यता नसल्याबाबतची माहिती घेऊ, असे त्यांनी सांगितले. कंत्राटी तत्वावरील आरोग्य कर्मचाऱयांचे पगार विनाकारण कापल्याच्या प्रकाराबाबत चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करण्याच्या सक्त सूचना पाटील यांनी अधिकाऱयांना दिल्या आहेत. जिह्यात कोरोना आटोक्यात आणण्यासाठी चांगले काम करणाऱया सर्व यंत्रणेचे त्यांनी कौतुक केले.
रिक्त पदभरतीबाबत येत्या काही दिवसांत कार्यवाही: पाटील
जिल्ह्य़ात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱयांची रिक्त पदे भरण्याबाबत शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. कोविडच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी स्थानिक पातळीवरच भरण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना दिले आहेत. येत्या काही दिवसात राज्यस्तरावरुनही भरतीबाबत कार्यवाही हेणार असल्याचे सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी सांगितले.
शासकीय डॉक्टरांनी खासगी सेवा दिल्यास कडक कारवाई
कोरोनाशी आरोग्य यंत्रणा झगडत आहे. मात्र जिल्हा शासकीय रुग्णालयात शासनाकडून नेमलेल्या काही वैद्यकीय अधिकाऱयांचा खासगी रुग्णालयात वावर अधिक आहे. अशा वैद्यकीय अधिकाऱयांना शासन पगार देत असल्याने त्यांना खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करता येणार नाहीत. यावर आरोग्य अधिकाऱयांनी करडी नजर ठेवून संबधितांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.