राज्य कल्याण निधीचे आजीवन सदस्यत्व मिळणार
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील खासगी शाळा-कॉलेजमधील शिक्षक, प्राध्यापकांना कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधीचे आजीवन सदस्यत्व देण्याबरोबरच या निधीअंतर्गत देण्यात येणाऱया सुविधा लागू होणार आहेत. यासाठी शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी ठोस पावले उचलल्याने शिक्षक कल्याण निधीतील सुविधा सरकारी, अनुदानित शिक्षकाप्रमाणेच खासगी शिक्षकांनाही मिळणार आहेत.
कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी, विद्यार्थी कल्याण निधी आणि राष्ट्रीय शिक्षक कल्याण प्रतिष्ठानने यासंबंधीचा आदेश जारी केला आहे. अपघात आणि मृत्यूनंतर मदत, निवृत्त शिक्षकांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी साहाय्य, शिक्षक व त्यांच्यावर अवलंबून असणाऱयांना वैद्यकीय मदत, शिक्षकांच्या मुलांना विद्यार्थी प्रतिभा शिष्यवृत्ती, शिक्षकांना लॅपटॉप, टॅब खरेदीसाठी अर्थसाहाय्य, बिनव्याजी साहाय्यधन, अभियांत्रिकी, वैद्यकीय शिक्षण घेणाऱया शिक्षकांच्या मुलांची बँकेतील शैक्षणिक कर्जफेड या सुविधा खासगी शिक्षकांनाही मिळविता येणार आहेत.
कोरोनाकाळात खासगी शिक्षकांना मदत देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले होते. कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधीचे आजीवन सदस्य देऊन खासगी शिक्षकांना या सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याकरिता शिक्षकांनी 3 हजार रुपये भरून आजीवन सदस्यत्वाचे कार्ड मिळवावे लागणार आहे.