कोरोनाचा फैलाव वाढत असल्याने आरोग्यमंत्री के. सुधाकर यांची सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोनाची तीव्रता वाढू लागली आहे. तसा आरोग्यसेवेवरचा ताणही वाढू लागला आहे. सरकारी हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची संख्या वाढत जाईल तसे सरकार आपले लक्ष खासगी नर्सिंग होम्सकडे वळवणार, हे निश्चित आहे. त्यादृष्टीने आरोग्य व वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. के. सुधाकर यांनी सुतोवाच केले आहे. खासगी हॉस्पिटल्सनी 50 टक्के बेड्स कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवावेत, अशी सूचना त्यांनी केली आहे.
खासगी हॉस्पिटल्स आणि नर्सिंग होम्स असोसिएशनच्या पदाधिकाऱयांशी व्हिडिओद्वारे त्यांनी चर्चा केली. कोविड नसलेल्या परंतु स्टेबल (स्थिर) असलेल्या रुग्णांना घरी पाठविले जावे व त्यांचे बेड्स कोविड रुग्णांना द्यावेत, अशी सूचना त्यांनी केली. याबाबत एक आठवडय़ाचा अवधी असोसिएशनने मागून घेतला आहे. तसेच रोगाची कमी लक्षणे असणाऱया रुग्णांना व लक्षणे विरहीत रुग्णांना हॉटेल, कोविड केअर सेंटर येथे दाखल करावे, अशी सूचनाही करण्यात आली आहे.
लॉकडाऊनसारखा निर्णय कष्टप्रद ठरणार आहे. तांत्रिक सल्लागार समिती कोरोनाची तीव्रता व परिस्थिती यांचा आढावा घेऊन सरकारने कोणती पाऊले उचलावीत, याबाबत माहिती देणार आहे. लॉकडाऊनमुळे आर्थिक संकट ओढवणार आहे. हे आपल्याला गेल्या अनुभवावरून समजले आहे. मात्र तशी वेळ येऊ नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे के. सुधाकर यांनी स्पष्ट केले.
सध्या काळजी घेणे-गर्दी टाळणे हितावह ठरेल
गतवषीसुद्धा खासगी हॉस्पिटल्सना 50 टक्के बेड देण्याची सूचना करण्यात आली होती. बेळगावमध्ये त्याची अंमलबजावणीही झाली. सध्या रुग्णांची संख्या कमी आहे. परंतु परराज्यातील रुग्ण अधिक संख्येने येत आहेत. परराज्यात रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. तेथे जर बेड्स फुल्ल झाले तर येथील हॉस्पिटल्सचा वापर केला जाईल. दरम्यान जर राज्यात किंवा शहरात रुग्णसंख्या अधिक वाढली तर कठीण परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे सध्या तरी सर्वांनी काळजी घेणे व गर्दी टाळणे हितावह ठरेल. हॉस्पिटल्सना बेड उपलब्ध करून देण्यात अडचण नाही. परंतु सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो तो आरोग्य सेवक कर्मचाऱयांचा. कोरोनाग्रस्त दाखल झाल्यास बहुसंख्य स्टाफ नोकरी सोडून जातो. त्यामुळे खासगी हॉस्पिटल्ससमोर धर्म संकट उभे राहते. याचाही सरकारने विचार करावा.
-डॉ. अनिल पाटील-अध्यक्ष आयएमए
लॉकडाऊन आर्थिकदृष्टय़ा परवडणार नाही
परिस्थिती गंभीर आहे, हे लक्षात घेण्याची गरज आहे. लॉकडाऊन हा उपाय आहे, परंतु आर्थिकदृष्टय़ा तो परवडणार नाही. मात्र खासगी हॉस्पिटल्स चालकांना कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करून देणे अपरिहार्य होणार आहे. गतवषीसुद्धा खासगी हॉस्पिटल्सना कोविड रुग्णांसाठी जागा उपलब्ध करून द्यावी लागलीच होती.
-डॉ. देवगौडा-सचिव आयएमए