रीता बहुगणांच्या नातीचा मृत्यू : फटाक्यांमुळे लागली कपडय़ांना आग
वृत्तसंस्था/ प्रयागराज
अलाहाबादच्या भाजप खासदार रीता बहुगुणा जोशी यांची 8 वर्षीय नात किया हिचा सोमवारी रात्री मृत्यू झाला आहे. दिवाळीच्या रात्री फटाके वाजवताना किया आगीत होरपळली होती. प्रयागराजच्या खासगी रुग्णालयात तिच्यावर उपचार सुरू होते. दिल्लीत हलविण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला आहे. खासदारांचा पुत्र मयंक यांची किया कन्या
होती.
अन्य मुलांसोबत घराच्या गच्चीवर ती खेळत होती. त्याचवेळी फटाक्यांमुळे तिच्या कपडय़ांना आग लागल्याची शक्यता व्यक्त होत आहे. किया अलिकडेच स्वतःची आई ऋचा जोशी आणि आजी-आजोबांसोबत कोरोनातून बरी होऊन घरी परतली होती.
पटाक्यांमुळे कपडय़ांना आग लागल्यावर किया विव्हळून ओरडत होती, परंतु मुले परस्परांमध्ये भांडत असावीत, असा कुटुंबीयांचा समज झाला. याचमुळे तेथे कुणीच लक्ष दिले नाही. काही वेळानंतर कियाचे मामा अंकुर वैश्य तेथे गेले असता त्यांना घडलेला प्रकार समजला. या आगीत किया 60 टक्क्यांपर्यंत होरपळली होती. रुग्णालयात कियाची प्रकृती गंभीर झाली होती. खासदार रीता यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांच्याशी संपर्क साधून तिला दिल्लीत हलविण्याची तयारी चालविली होती. मंगळवारी सकाळी तिला हवाई रुग्णवाहिकेद्वारे दिल्लीच्या सैन्य रुग्णालयात हलविण्यात येणार होते, परंतु सोमवारी रात्री 1.30 ते 2 वाजण्यादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला आहे.
या घटनेनंतर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दूरध्वनीवरून खासदार बहुगुणा यांच्याकडे शोक व्यक्त केला आहे. तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य, मंत्री नंद गोपाल गुप्ता यांच्यासमवेत अनेक भाजप नेत्यांनी बहुगुणा यांच्या घरी धाव घेतली आहे.