वृत्तसंस्था / नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्षांच्या अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक घेतली आहे. या बैठकीत संसदेच्या वर्तमान हिवाळी अधिवेशनातील विरोधकांच्या संयुक्त रणनीतिवरून चर्चा करण्यात आली. सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी 10 जनपथवर आयोजित या बैठकीत पवार यांच्यासह नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला, शिवसेना नेते संजय राऊत तसेच द्रमुक नेते टी.आर. बालू सामील झाले. तर काँग्रेस खासदार राहुल गांधीही या बैठकीत उपस्थित होते.
आगामी काही दिवसांमध्ये अशा आणखीन बैठका घेत सर्व विरोधी पक्षांना एकजूट केले जाणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. सोनिया गांधी यांनी या बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांना आमंत्रित केले होते. परंतु या दोन्ही नेत्यांनी बैठकीसाठी राऊत आणि बालू यांना पाठविले.
तृणमूलला ठेवले दूर
खासदारांचे निलंबन रद्द व्हावे याकरता शरद पवार यांना राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांच्याशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे. तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला या बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले नव्हते.