खासदारांना त्यांच्या पसंतीचे आसन मिळावे – विमानतळावर व्हीआयपी पार्किंग – चेकइनमध्ये प्राथमिकता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एअर इंडियाच्या खासगीकरणानंतर सरकारला विमानतळ आणि फ्लाइटमध्ये खासदारांच्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चिंता सतावू लागली आहे. सरकारने एअर इंडिया समवेत सर्व एअरलाइन्स कंपन्यांना पत्र लिहून खासदारांना विशेष ट्रीटमेंट देण्याची सूचना केली आहे. सर्व एअरलाइन्स, विमानतळ ऑपरेटर्स आणि विमानोड्डाण सुरक्षा नियामकाला विमानतळावर खासदारांना प्रोटोकॉल, शिष्टाचार आणि सहाय्य देण्यास सांगितले आहे.
एअर इंडिया ही कंपनी टाटांच्या हातात गेल्यावर देशात अलायन्स एअर वगळता उर्वरित सर्व एअरलाइन्स आता खासगी नियंत्रणात आहेत. याचबरोबर देशात पीपीपी विमानतळांची संख्याही वेगाने वाढत आहे.
सीट बुकिंगमध्ये प्राथमिकता
केंद्रीय विमानोड्डाण मंत्रालयाकडून लिहिण्यात आलेल्या पत्रात विमानतळावर खासदारांच्या सुविधेकरता अनेक निर्देश नमूद करण्यात आले आहेत. विमानतळावर माननीय खासदारांना प्रोटोकॉल आणि शिष्टाचाराच्या संबंधी निष्काळजीपणा घडल्याची काही प्रकरणे समोर आली आहेत. याचमुळे हे निर्देश पुन्हा अधोरेखित करण्यात येत आहेत. यांचे योग्यप्रकारे पालन करावे अशी विनंती संबंधितांना करत असल्याचे पत्रात म्हटले गेले आहे. परंतु हे प्रोटोकॉल खासगी एअरलाइन्ससाठी नव्हते. पत्रानुसार सीट बुकिंगमध्ये खासदारांना प्राथमिकता द्यावी लागेल. याचबरोबर सीट रिकामी नसल्यास बुकिंग रद्द झाल्यास ते सर्वप्रथम खासदाराला उपलब्ध करावे लागणार आहे.
सरकारकडून पत्रात नमूद सुविधा…
विमानतळावर हजर वरिष्ठ कर्मचारी वर्गाने खासदाराला चेक-इन करताना सुविधा अन् सहकार्य करावे.
खासदारांना त्यांच्या पसंतीनुसार सीट देण्यात यावी.
खासदारांसाठी समोरील रांगेतील सीट आरक्षित करण्याचा प्रयत्न व्हावा.
एअर इंडियातून खासदार प्रवास करणार असल्यास संबंधित विमानतळाच्या अधिकाऱयांना याची माहिती दिली जावी, जेणेकरून योग्य व्यवस्था करता येईल.
विमानतळ प्राधिकरण आणि संचालकांनी खासदारांना मोफत चहा, कॉफी, पाण्यासह लाउंज सुविधा पुरवावी.
खासदारांसाठी व्हीआयपी पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी. याकरता संसद भवनाच्या कार पार्किंगचा पास ग्राहय़ धरण्यात यावा.
सर्व विमानतळांवर एक प्रोटोकॉल अधिकारी नियुक्त करावा, जो खासदारांना विशेष सुविधा मिळवून देण्यास मदत करेल.
चेक-इनदरम्यान सुरक्षा तपासणीदरम्यान खासदारांना त्रास होऊ नये याकरता सीआयएसएफ आणि एअरलाइन्सनी परस्परांमध्ये समन्वय साधावा.