ऑनलाईन टीम / नागपूर :
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला तात्काळ हलविण्यात आले आहे. नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह आला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्रकृती अधिक बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागरपूरला हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांच्यासह पती आणि आमदार रवी राणा, दोन्ही मुले, सासू-सासरे असे कुटुंबातील 12 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा अहवाला कोरोना पॉझिटिव्ह आला होता. नवनीत राणा यांच्या सासू-सासऱ्यांवर नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये आधीपासूनच उपचार सुरु आहेत.
आमदार रवी राणा यांचे वडील, म्हणजेच नवनीत कौर राणा यांचे सासरे गंगाधर राणा यांचा कोरोना रिपोर्ट 2 ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर कुटुंबातील इतर सदस्य, कार्यकर्ते अशा जवळपास 50 ते 60 जणांची कोरोना टेस्ट घेण्यात आल्या होत्या. यामध्ये नवनीत राणा यांच्या सह कुटुंबातील 12 जणांना कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले होते.