– 29 डिसेंबरला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश, पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी पाठविले समन्स
प्रतिनिधी/मुंबई
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स बजाविले आहेत. याप्रकरणी त्यांना 29 डिसेंबर रोजी ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे, अशी माहिती ईडी अधिकाऱयाने दिली.
पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी कलम 67 अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. पीएमसी बँक घोटाळÎाप्रकरणी ईडीकडून काहीजणांची चौकशी सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीत वर्षा राऊत यांचे नाव समोर आल्याने, त्यांना समन्स बजावले आहे.
यापूर्वी महाविकासआघाडीच्या नेत्यांना ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहेत. त्यावरून संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. आता त्यांच्या पत्नीला ईडीची नोटीस आल्याने, राऊत नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.
नुकतीच, भोसरीतील भूखंडाच्या व्यवहारासंदर्भात ईडीने माजी मंत्री आणि राष्टवादीचे नेते एकनाथ खडसे यांना नोटीस दिली आहे. तर, ईडीच्या चौकशीला सामोरे जाणार असून त्यासाठी 30 डिसेंबर रोजी मुंबईला जाणार आहोत, अशी माहिती खडसे यांनी दिली आहे. खडसेंना ईडीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर संजय राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. तर दुसरीकडे या नोटीसमुळे शिवसेना नेत्यांमध्ये चर्चांना उत आला आहे.