प्रतिनिधी/ बेळगाव
बसवेश्वर सर्कल खासबागचा येथे दर रविवारी भरणारा आठवडी बाजार संपूर्ण बेळगावातच मोठा बाजार आहे. मात्र लॉकडाऊनमुळे दि. 22 मार्चच्या रविवारपासून हा बाजार भरला नाही. लॉकडाऊनमुळे बाजार न भरल्याने सलग रविवारी बाजार बंद राहण्याची इतक्मया वर्षातील ही पहिलीच वेळ आहे. दर रविवारी भरणाऱया खासबाग येथील बाजारात लाखो रुपयांची उलाढाल होत असते. मात्र लॉकडाऊनमुळे व्यापारीवर्गास नुकसान सोसावे लागले आहे. सुरक्षिततेच्यादृष्टीने आठवडी बाजारावर बंदी घालण्यात आली असली तरी सध्या लॉकडाऊनमध्ये शिथिलता असून रविवारचा जनता कर्फ्युही हटविण्यात आला आहे. यामुळे जूनमधील येत्या रविवारी तरी खासबागचा बाजार भरविण्यास परवानगी मिळेल का? असा प्रश्न व्यापारीवर्गासह नागरिकांतून व्यक्त होत आहे.
रविवार दि. 22 मार्च रोजी स्वयंघोषित कर्फ्युमुळे येथील बाजार बंद ठेवावा लागला. त्यानंतर लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झाल्याने दि. 29 मार्च व दि. 5, 12, 19, 26 एप्रिल, 3, 10, 17, 24 व 31 मे असे सलग 11 रविवार खासबागचा आठवडी बाजार बंद ठेवावा लागला आहे. अद्यापही बाजार भरविण्यास प्रशासनाकडून परवानगी देण्यात न आल्याने येत्या रविवारी तरी खासबागचा बाजार भरेल का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. या भागातील असंख्य विणकर बांधव, शेतकरी बांधव, कष्टकरीवर्ग, कामगारवर्ग तसेच सर्वसामान्य नागरिकांची जीवनावश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी दर रविवारी सकाळी आठपासूनच बाजारपेठेत गर्दी होत असते. यामुळे बसवेश्वर सर्कल खासबागपासून नाथ पै सर्कल शहापूर मार्गावर रविवारी उशिरापर्यंत गर्दी लोटलेली असते. मात्र मार्चपासून लॉकडाऊनच्या आदेशाची अंमलबजावणी कडक करण्यात आल्याने रविवारी या परिसरात अक्षरश: शुकशुकाट जाणवत आहे.
खासबाग येथील बसवेश्वर सर्कलमध्ये दर रविवारी भरणाऱया आठवडी बाजाराची व्याप्ती वाढली आहे. बाजारात आवश्यक जवळजवळ सर्व साहित्य मिळत असल्याने या भागातील नागरिकांसह शहापूर, टिळकवाडी, अनगोळ, बेळगाव तसेच आसपासच्या ग्रामीण भागातूनही खरेदीसाठी प्रचंड गर्दी होत असते. मात्र, गेले 11 रविवार हा बाजार भरला नसल्याने कोटय़वधीचे नुकसान झाले आहे. सध्या सर्व दुकाने आणि व्यवहार सुरू करण्यास मुभा देण्यात आली आहे. रविवारचा जनता कर्फ्यूही हटविण्यात आला आहे. यामुळे पुढील रविवारपासून खासबागच्या बाजारास परवानगी देण्यात यावी, अशी मागणी व्यापारीवर्गासह परिसरातील नागरिकांच्यावतीने करण्यात येत आहे. नियमांचे पालन करून बाजार भरविण्यास परवानगी मिळण्याची आशाही व्यक्त करण्यात येत आहे.