पावणे दोन लाखाची रोकड पळविली : चोरटय़ांची करामत सीसीटीव्हीत कैद
प्रतिनिधी /बेळगाव
जुना पी. बी. रोड, गणेशनगर, खासबाग येथील एका कुरियर कंपनीत चोरीचा प्रकार घडला आहे. रविवारी सकाळी ही घटना उघडकीस आली असून चोरटय़ांनी 1 लाख 76 हजार 265 रुपये रोकड पळविली आहे. या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
खासबाग येथील ई-कॉम एक्स्प्रेस या कुरियर कंपनीत चोरीचा हा प्रकार घडला आहे. व्यवस्थापक साईनाथ शिंदोळकर यांनी शहापूर पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. कंपनीच्या कार्यालयाचे शटर उचकटून चोरटय़ांनी कार्यालयात प्रवेश केल्याचे उघडकीस आले आहे.
चोरटय़ांनी कॅशबॉक्समधील रक्कम पळविली आहे. चोरटय़ांची करामत सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले आहे. फुटेजवरून चोरटय़ांचा शोध घेण्यात येत आहे. शनिवारी मध्यरात्री 1.20 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून चौघा जणांची छबी कॅमेऱयात कैद झाली आहे.
नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री या कार्यालयाला कुलूप लावण्यात आले होते. रविवारी सकाळी शटर उचकटण्यात आल्याचे उघडकीस आले. त्यामुळे शहापूर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. चोरटय़ांचा माग काढण्यासाठी ठसेतज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलीस निरीक्षक विनायक बडिगेर पुढील तपास करीत आहेत.