प्रतिनिधी / सातारा :
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस सोमवार दि. 25 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत असून सोमवारी खासदार उदयनराजे, आमदार जयकुमार गोरे यांच्यासह राष्ट्रवादी पॅनेलचे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शिवेंद्रराजे, आमदार शशिकांत शिंदे अशी दिग्गज मंडळी आपला अर्ज दाखल करणार आहेत. तसेच काही हौसे, गवसेही अर्ज दाखल करणार आहेत.
दरम्यान, जिल्हा बँकेत खासदार उदयनराजेंना येवूच न देण्यासाठी राष्ट्रवादीने व्युहरचना शनिवारच्या पुण्यातल्या बैठकीत केल्याची राष्ट्रवादीच्या गोटात जोरदार चर्चा आहे. तर भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी त्यांच्या विरोधात दोन उमेदवार शोधलेत ते कोण?, अशीही चर्चा सुरु आहे. दरम्यान, उदयनराजे राष्ट्रवादीचा व्युहरचना कशी भेदणार अन् जिल्हा बँकेत कसा प्रवेश करणार याकडे सगळय़ांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आता रंग भरु लागला आहे. अर्ज दाखल करण्याचा सोमवारी शेवटचा दिवस राहिला असून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मात्र ही निवडणूक एकतर्फी काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न सुरु केलेला आहे. विरोधकांना जिल्हा बँकेची पायरी सुद्धा चढू द्यायची नाही असे मनसुबे आखले गेले आहेत.