कुडाळ / प्रतिनिधी :
जगामध्ये कोरोनाची महामारी सुरू झाल्यानंतर नात्यामधली आपुलकी प्रेम जिव्हाळा आणि माणुसकीची खरी ओळख सर्वांना होऊ लागली. काही अमानवी नाती दिसली तर काहींनी माणुसकीचे खरे दर्शन घडविले. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या काही संस्थांमध्ये प्रामुख्याने ज्याचे नाव घ्यावे, अशी खिदमत ए खल्क ही संस्था साताऱ्यामध्ये मागील वर्षांपासून ‘मानवतेच्या सेवेसाठी सदैव’ हे ब्रीद घेऊन कार्य करत आहे.
या संस्थेमार्फत गरजूंना रेशन, ऑक्सिजन बेडची उपलब्धता, मोफत औषधे, सर्व धर्मियांच्या अंत्यविधीचे सोपस्कार, रेस्क्यू टीम, मोफत रुग्णवाहिका पुरविण्याचे कार्य केले जात आहे. समाजामध्ये जनजागृती करण्याचे काम करत कोरोना बाधितांचे व नातेवाईकांचे मनोधैर्य वाढवण्याचे कार्यही या संस्थेकडून केले जात आहे.
सातारावासीयांची ऑक्सिजन पुरवठय़ाची गरज लक्षात घेत संस्थेने माजी आमदार बाबा सिदिक्की यांच्याशी संपर्क साधला. बाबा सिधिक्की विचार मंचच्यावतीने सातारकरांसाठी 10 ऑक्सजिन कॉन्संट्रेटर मशीन, अंतविधी व रुग्णाची देखभाल यासाठी 100 पीपीई किट तसेच 10 स्टेबिलायझर उपलब्ध करुन दिले.
‘खिदमत ए खल्क’ संस्थेकडे आज 18 ऑक्सिजन मशीन व 2 सिलेंडर उपलब्ध आहेत. कमी एचआरसीटी स्कोर असणारांसाठी 20 बेडचे मोबाईल हॉस्पिटल आहे. जे गरजवंत रुग्ण आहेत, त्यांनी खिदमत ए खल्ककडे संपर्क साधावा. त्यांना घरपोच मशीन दिली जाईल, असे आवाहन खिदमत ए खल्क संस्थेकडून करण्यात आले आहे.