प्रतिनिधी / ओरोस:
वृद्धाचा खून केल्याच्या आरोपातून आनंद दिगंबर साळगावकर (39, रा. कविलकट्टा-कुडाळ) आणि सुनीता पुंडलिक राठोड (25, रा. पानबाजार-कुडाळ) या दोघांनाही प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. व्ही. हांडे यांनी सबळ पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली. संशयित आरोपांच्यावतीने ऍड. संग्राम देसाई, ऍड. अविनाश परब, ऍड. अश्पाक शेख, ऍड. संदेश राणे यांनी काम पाहिले.
30 ऑगस्ट 2018 रोजी नेवाळे भोगवे बीच येथे एका वृद्धाचा कुजलेल्या स्थितीत मृतदेह आढळला होता. तपासाअंती सदर मृतदेह तळगाव-राऊतवाडी येथील विजय विष्णू सावंत (64) यांचा असल्याचे निष्पन्न झाले होते. याबाबत घातपात असल्याचा संशय नातेवाइकांकडून व्यक्त करण्यात आला होता. सदर वृद्धाच्या नातेवाईकांनी तक्रारी म्हटले होते की, प्रेमात अडसर ठरत असल्याने आनंद साळगावकर आणि सुनीता राठोड यांनी संगनमताने विजय सावंत यांच्या डोक्यावर रॉड मारून आणि नाक व तोंडावर उशी दाबून त्यांचा खून केला. सुनीता राहत असलेल्या पानबाजार येथील खोलीत 27 ऑगस्ट रोजी दुपारी ही घटना घडली. त्यानंतर मृतदेह काही तास बाथरूममध्ये ठेवण्यात आला होता. त्यानंतर मध्यरात्री पिशवीत भरून खांद्यावरून भंगसाळ नदी पात्रात फेकल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार निवती पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ओरोस येथील जिल्हा व सत्र न्यायालयात झालेल्या या खटल्याच्या सुनावणीत संशयितांवरील आरोपाबाबत सबळ पुरावा न्यायालयासमोर सादर होऊ शकला नाही. तसेच खून झाल्याच्या घटनाक्रमात तफावत आढळून आली. त्यामुळे आरोपींच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राहय़ मानून न्यायालयाने संशयितांची निर्दोष मुक्तता केली.