पाच जणांना पोलीस कोठडीत घेऊन चौकशी
प्रतिनिधी/ बेळगाव
अरबाज मुल्ला (वय 24) या तरुणाच्या खुनासाठी वापरलेली शस्त्र शनिवारी खानापूर पोलिसांनी जप्त केली आहेत. या प्रकरणी दहा जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी पाच जणांना पोलीस कोठडीत घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे.
अटक करण्यात आलेल्या दहापैकी पाच जणांची रवानगी हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली आहे. पुंडलिक मुतगेकर, शैला कुंभार, कुतबुद्दीन बेपारी, मंजुनाथ गोंधळी, गणपती गोंधळी या पाच जणांना 12 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत घेण्यात आले आहे.
त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. शनिवारी खुनासाठी वापरलेली तलवार, कोयता व चाकू जप्त करण्यात आल्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख अमरनाथ रेड्डी यांनी सांगितले. उर्वरित पाच जणांनाही सोमवारनंतर चौकशीसाठी पोलीस कोठडीत घेण्यात येणार आहे. विशेष पथकातील अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.
पोलीस तपासात धक्कादायक गोष्टींचा उलगडा झाला आहे. 26 सप्टेंबर रोजी समेटासाठी बोलाविलेल्या बैठकीच्यावेळी अरबाजच्या मोबाईलमधील संबंधित तरुणीचे फोटो कुटुंबीय व मध्यस्थांनी डिलिट केले होते. फोटो डिलिट करून सीमकार्ड मोडतानाच ‘आता त्या तरुणीचा नाद सोड’, असा दम अरबाजला भरण्यात आला होता. त्यानंतरही त्याचा तरुणीशी संपर्क सुरूच होता. त्यामुळे भडकलेल्या कुटुंबियांनी अरबाजच्या खुनाची सुपारी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.