बेळगाव रेल्वे पोलिसांची कारवाई
बेळगाव रेल्वे स्थानकाबाहेरील स्कूटर पार्किंगमध्ये काम करण्यावरून दोन दिवसांपूर्वी एका तरुणावर खुनी हल्ल्याचा प्रकार घडला होता. या संबंधी बुधवारी रात्री रेंल्वे पोलिसांनी गुडशेड रोड रेल्वे क्वॉर्टस येथील तरुणाला अटक केली आहे.
मंजुनाथ ओबळेश बळ्ळारी (वय 23 रा. रेल्वे क्वॉर्टर्स) असे अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. बुधवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
1 जानेवारी रोजी रेल्वे स्थानकाबाहेरील स्कूटर पार्किंगमध्ये चंद्रशेखर रवी चिंतामनी (वय 28 रा. गणेशनगर हिंडलगा) या तरुणावर खुनी हल्ला करण्यात आला होता. चंद्रशेखर हा पार्किंगमध्ये काम करतो. तर मंजुनाथ हा जुना कामगार आहे. लाठीने चंद्रशेखरवर हल्ला करण्यात आला असून या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.