संशयित दोघांना अटक, शाहूपुरीच्या डीबी पथकाला यश
प्रतिनिधी/ सातारा
मंगळवार तळे परिसरात 2017 साली अक्षय वाघमळे यांचा खून आप्पा मांढरे यांनी केल्याचा संशय होता. अक्षय आरोपींचा मित्र असल्याने त्याच्या खूनाचा बदला घेण्यासाठी आप्पा मांढरेवर बेछुट गोळीबार करण्यात आला. या प्रकरणातील मुख्य सुत्रधार ऋषभ राजेंद्र जाधव (वय 25, रा. रविवारपेठ सातारा) व चंद्रकुमार मारूती निगडे (वय 25, रा. पाटखळमाथा वाढे ता. सातारा) यांना शाहूपुरीच्या डीबी पथकाने अटक केली आहे. ऋषभ हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, बुधवार दि. 9 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दिपक उर्फ आप्पा मांढरे यांच्यावर राजवाडा येथील गोल बागेजवळ गोळीबार झाला. या गोळीबारातील मुख्य सुत्रधार फरार झाले. आप्पा जखमी झाल्याने त्यांच्यावर पुणे येथील खाजगी रूग्णालयात उपचार सुरू होते. अवघ्या काही तासात या गुह्यातील एक आरोपी व दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले. परंतु मुख्य सुत्रधार फरार असल्याने त्यांचा शोध सुरू होता. तोच शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाला ऋषभ जाधव हा हांडेवाडी, हडपसर (ता. पुणे) येथे असल्याची माहिती मिळाली. पथकाने शोध मोहीम राबवत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या आणखी एक साथीदार चंद्रकुमार निगडे याला सातारा येथून ताब्यात घेतले. आप्पा मांढरे याने 2017 साली ऋषभ व चंद्रकुमार यांचा मित्र अक्षय याला जीवे मारल्याच्या रागातून हा गोळीबार केल्याची कुबली दिली. या दोघांना अटक करून पिस्तुल व मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.