उत्तर कर्नाटकातील बंटर समाज आक्रमक
प्रतिनिधी /बेळगाव
दोन दिवसांपूर्वी लक्ष्मीनगर-वडगाव येथील बाळकृष्ण नागेश शेट्टी (वय 50) या पानदुकान चालकाचा भीषण खून झाला होता. या घटनेची उत्तर कर्नाटकातील बंटर समाजाने गांभीर्याने दखल घेतली असून न्यायासाठी समाजबांधव आक्रमक झाले आहेत. गरीब पानदुकानदाराचा हाकनाक बळी घेणाऱया गुन्हेगाराला कठोर शिक्षा द्या, अशी मागणी केली.
गांधीनगर येथील सभागृहात शुक्रवारी सकाळी समाजबांधवांची बैठक झाली. केवळ बेळगावच नव्हे तर हुबळी-धारवाड, कारवारसह उत्तर कर्नाटकातील अनेक जिल्हय़ांतून आलेल्या समाजबांधवांनी बैठकीत भाग घेतला. खुनाच्या घटनेचा निषेध नोंदविण्यात आला. बैठकीनंतर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांना निवेदन देण्यात आले.
बेळगाव येथील समाजाचे प्रमुख विठ्ठल हेगडे, चंद्रशेखर शेट्टी, श्रीधर शेट्टी, विजय सालीयान, सुजन पुजारी, राजेंद्र शेट्टी, महेश शेट्टी, सुधाकर शेट्टी, सुधीर हेगडे आदींसह उत्तर कर्नाटकातील बंटर समाजाचे अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. पोलीस उपायुक्तांना निवेदन देऊन आरोपीला कडक शिक्षा करा, अशी मागणी करण्यात आली.
उधारी दिली नाही म्हणून पानदुकानदाराचा खून करेपर्यंत गुन्हेगारांची मजल जात आहे. यावरून कायदा व सुव्यवस्था परिस्थिती ठिक नाही, असाच अर्थ होतो. कर्त्यापुरुषाच्या खुनामुळे कुटुंब रस्त्यावर आले आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांनी उपाययोजना करण्याची गरज आहे. जर अशी दादागिरी सुरू राहिली तर गरीब व्यापाऱयांचे जगणे मुश्कील होणार आहे. याकडे पोलीस अधिकाऱयांचे लक्ष वेधण्यात आले.
तर खुनाचा प्रकारच घडला नसता
पोलीस आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यासाठी पोहोचलेल्या समाजातील काही प्रमुखांनी गंभीर विषयांकडे पोलीस अधिकाऱयांचे लक्ष वेधले. खून झालेल्या बाळकृष्ण शेट्टी यांच्या मुलाने तर वडगाव, खासबाग परिसरात नशेबाजांचा वावर वाढला आहे. उधारी दिली नाही म्हणून धमकावणे, हल्ले करणे, खून करणे आदी प्रकार घडत आहेत. वडिलांना धमकावल्यासंबंधी स्थानिक पोलिसांना माहिती दिली होती. त्यांनी जर आरोपीवर कारवाई केली असती तर खुनाचा प्रकारच घडला नसता, असे बाळकृष्ण यांच्या मुलाने सांगितले.