बेळगाव
खवटकोप्प (ता. अथणी) येथील एका तरुणाच्या खूनप्रकरणी त्याच गावातील एका युवकाला चिकोडी येथील सातवे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. एल. चव्हाण यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
20 जुलै रोजी न्यायालयाने रवी उर्फ रविकुमार शेट्टय़ाप्पा दोडमनी (रा. खवटकोप्प) याला खूनप्रकरणी जन्मठेप व 15 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. 10 ऑगस्ट 2017 रोजी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास खवटकोप्प येथून कोळीगुड्डकडे जाणाऱया कच्च्या रस्त्यावर प्रातःविधीसाठी गेलेल्या कुमार मारुती सरीकर या तरुणाचा खून करण्यात आला होता.
आरोपी रवीच्या पत्नीशी सलगीने बोलल्याच्या रागातून रवीने कुमारचा विळय़ाने वार करून खून केला होता. याप्रकरणी अथणी पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक शेखऱयाप्पा एच. यांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. सरकारतर्फे सुरुवातीला एस. आर. पाटील व नंतर वाय. जी. तुंगळ यांनी काम पाहिले.