कुंकळी औद्योगिक वसाहतीतील खुनाचे प्रकरण
प्रतिनिधी/ मडगाव
सिद्दरामय्या वंडाल (66) या कुंकळी औद्योगिक वसाहतीत काम करणाऱया सुरक्षा रक्षकाच्या खून प्रकरणातील आरोपी अद्याप फरारीच आहे. आसाम राज्यातील लक्षी बासुमतार (46) हा या खून प्रकरणातील संशयित आरोपी आहे आणि तो सध्या फरारी आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार खुनाची ही घटना 24 नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. सिद्दरामय्या वंडाल हा मूळ कर्नाटकातील गोकाक-बागेवाडी येथील. मात्र सध्या तो आपल्या कुटूंबासमवेत कुडचडे येथे राहात होता. कुंकळी येथील औद्योगिक वसाहतीत सुरक्षा रक्षक म्हणून कामाला होता.
23 रोजी मध्यरात्रीच्या सुमाराला हा सुरक्षा रक्षक ‘बोट क्राफ्ट’ या आस्थापनाच्या आवारात खुर्चीवर बसून आपली डय़ुटी करीत होता. मध्यरात्रीनंतर कधीतरी या सुरक्षा रक्षकाला डुलकी लागली आणि हीच संधी घेऊन एका अज्ञात हल्लेखोराने या सुरक्षा रक्षकाच्या डोक्यावर अवजड वस्तूचा आघात करुन खून केला.
वाद झालेला
काही दिवसापूर्वी मयत सिद्दरामय्या व संशयित लक्षी याच्यात एका किरकोळ कारणावरुन वाद झाले होते आणि त्यातूनच खुनाची ही घटना घडली असावी असा पोलिसांचा प्राथमीक कयास आहे.
या आस्थापना दोनच सुरक्षा रक्षक होते. एक आसाम येथील लक्षी बासुमतार (46) आणि सिद्दरामय्या वंडाल (66). लक्षी दिवसपाळीला तर मयत सिद्दरामय्या रात्रपाळीला.
या आस्थापानात काम करणारा एक कामगार 24 रोजी सकाळी या आस्थापनात जाण्यासाठी आला तेव्हा गेट बंद असल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाकडे आला तेव्हा खुर्चीवर बसलेल्या स्थितीत असलेल्या सिद्दरामय्या याच्याकडे येऊन गेटची चावी मागितली तेव्हा सिद्दरामय्या याच्या नाकातून रक्त येत असल्याचे त्याला आढळून आले होते आणि त्यानंतर या कामगाराने आस्थापनाचे मालक जॉन फर्नाडिस यांना कल्पना दिली होती. त्यानंतर ऍम्बूलन्स आली आणि त्यातील कर्मचाऱयांनी सिद्दरामय्या दगावला असल्याची माहिती दिली.
आरोपी फरारीच
पुंकळी पोलिसांनी अज्ञात संशयिताविरुद्ध या खून प्रकरणी भारतीय दंड संहितेच्या 302 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. शनिवारी रात्री कुंकळी पोलिसांकडे संपर्क साधून या खून प्रकरणी संशयित आरोपी सापडला का अशी विचारणा केली तेव्हा या खून प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.