चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाने केला जामीन मंजूर
प्रतिनिधी / बेळगाव
अनैतिक संबंधातून खून केलेल्या तिघा संशयितांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. बसवराज परसाप्पा कित्तूर, शशिकुमार बसवराज इट्टी आणि सुनंदा सानाप्पा कित्तूर अशी जामीन मंजूर झालेल्यांची नावे आहेत. या तिघांनी संगनमताने महेश ऊर्फ प्रवीण गोविंदाप्पा दासर (वय 22, गुलगुंडी, ता. रोन, जि. गदग) याचा खून केला होता.
महेश याचे सुनंदा हिच्याशी अनैतिक संबंध होते. सुनंदाकडून महेश याने 40 हजार रुपये उसणे घेतले होते. ती त्याला माझ्याशी लग्न कर असे सांगत होती. मात्र महेशने तिला नकार दिला. यामुळे त्याचा काटा काढण्याचे ठरवून सुनंदा हिने तिचा चुलतभाऊ बसवराज कित्तूर आणि शशिकुमार याला याची माहिती दिली.
त्यानंतर दि. 7 नोव्हेंबर 2020 रोजी महेशचा खून करून मृतदेह फेकून दिला होता. सदर मृतदेह गोकाक-यरगट्टी रोडवर सापडला होता. त्यानंतर मुरगोड पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी याचा तपास केला असता या तिघांनी खून केल्याचे उघडकीस आले होते. पोलिसांनी या तिघांवर भा.दं.वि. 120(बी), 341, 302, 201 सहकलम 34 आणि ऍट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवून अटक केली होती. त्यानंतर या तिघांनी येथील तिसरे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र न्यायालयाला सुटी असल्याने या न्यायालयाचे अधिकार चौथे अतिरिक्त जिल्हासत्र न्यायालयाकडे देण्यात आले होते. त्याठिकाणी संशयित आरोपींचे वकील सिद्धार्थराजे सुरेशराजे सावंत यांनी या तिघांची बाजू मांडून जामीन मिळावा यासाठी युक्तिवाद केला. न्यायालयाने या तिघांनाही 1 लाख रुपयांचे वैयक्तिक हमीपत्र आणि तितक्मयाच रकमेचा एक जामीनदार या अटींवर सुटका केली आहे.