विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा व्यवस्थापिका खून प्रकरण
प्रतिनिधी/ गुहागर
शाखा व्यवस्थापिका खून प्रकरणातील दुसरा आरोपी सत्यजित पटेकर याची मानसिक स्थिती सर्वसामान्य असल्याचा दाखला जिल्हा रूग्णालयाने दिला आहे. यामुळे त्याला 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
गुहागर तालुक्यातील वेलदूरमधील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापिका सुनेत्रा दुर्गुळे यांचा बुधवारी सायंकाळी खून झाला. ही घटना गुरुवारी उघडकीस आली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक किरणकुमार कदम यांनी दोन्ही आरोपींना फक्त चार तासांमध्ये अटक केली. शुक्रवारी या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी सुमारे 7 लाखांची रक्कम वसूल करणे, घटनेचा अधिक तपशील समजून घेणे, अन्य काही पुरावे शोधणे आदी कामांसाठी पोलिसांनी आरोपींना पोलीस कोठडी द्यावी अशी बाजू न्यायालयासमोर मांडली. त्यामुळे पहिला आरोपीसंजय फुणगुसकर याला न्यायालयाने 25 सप्टेंबरपर्यत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मात्र दुसरा आरोपी सत्यजित पटेकर हा मानसिक रुग्ण असल्याचे त्याच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे न्यायालयाने पटेकरबाबतचा निर्णय राखून ठेवत पोलिसांना त्याची आरोग्य तपासणी करण्यास सांगितले.
न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक किरण कुमार कदम यांनी शनिवारी पटेकरला तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात नेले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱयांनी त्याची तपासणी केली. यात सत्यजितची मानसिक अवस्था सामान्य असल्याचा दाखला वैद्यकीय अधिकाऱयांनी दिला. हा दाखला पोलिसांनी न्यायालयासमोर सादर केला असता न्यायालयाने पटेकर यालाही 25 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खून प्रकरणात या दोघांव्यतिरिक्त आणखी कोणी आहे का, याचा तपास पोलीस करणार आहेत.