काँग्रेस उमेदवार राजेश वेरेकर
प्रतिनिधी /फोंडा
सोमवारी सायंकाळी मतदान आटोपल्यानंतर घरी पोचायला नेहमीप्रमाणेच बराच उशिर झाला. त्यामुळे मंगळवारी जरा उशिराच जाग आली. आवरा आवर होईपर्यंत प्रमुख कार्यकर्ते घरी पोचले होते. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर 11 वा. घरातून बाहेर पडलो. काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांची पणजीत बैठक होती. बैठक आटोपून 4 वा. घरी पोचलो. तासभर झोप घेतल्यानंतर पुन्हा कार्यकर्त्यांशी चर्चा व रात्री एका कार्यकर्त्याचा वाढदिवस त्याच्या घरी साजरा केला. फोंडय़ातील काँग्रेसचे उमेदवार राजेश वेरेकर हे मतदानानंतर दुसऱया दिवशी थोडसे रिलेक्स मूडमध्ये दिसले.
काँग्रेसची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच दोन महिने आदी आपले प्रचारकार्य सुरु झाले होते. सायं. 4 ते रात्री 8 वा. यावेळेत काही प्रोमिनंट मतदारांच्या गाठीभेटी व चर्चा असा महिनाभर कार्यक्रम चालला होता. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर सकाळच्या सत्रात 9.30 ते दुपारी 12.30 वा. घरोघरी प्रचार व सायंकाळच्या सत्रात कोपरा बैठका अशी प्रचाराची धामधूम सुरु होती. बारा दिवसात तब्बल 60 कोपरा बैठका झाल्या. मतदारसंघ आटोपशीर असल्याने दुपारचे जेवण घरीच घेतल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते अधिक योग्य ठरले. सकाळचा चहा नाश्ता मात्र कार्यकर्त्यांसोबत व्हायचा. दोन महिन्यांच्या या धावपळीत रोजचे मोर्निंग वॉक चुकले. रात्री नेट सिरीजवर कार्यक्रम पाहण्यातही खंड पडला. सहा महिने गोव्याबाहेर जाता आले नाही. एरवी आठवडय़ातून एकदा फॅमिलीसोबत होणारा हॉटेलमधील डिनरही या काळात घेता आला नाही. दोन महिने ऑफिसच्या कामातून पूर्ण सुट्टी घेतली होती. सध्या विविध माध्यमातून जे एक्झिट पोल सुरु आहेत, त्यातून फोंडय़ात काँग्रेसचा उमेदवारच पहिल्या क्रमांकावर दाखवतो. त्यामुळे विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचे त्यांनी सांगितले.