सातारा / प्रतिनिधी :
रस्त्याच्या कामाचे बिल मंजूर करून धनादेश दिल्याच्या मोबदल्यात 7500 रुपयांच्या लाचेची मागणी करून त्यापैकी 6500 रुपयांची लाच स्वीकारताना खेड, ता. सातारा येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर दगडू गायकवाड (वय 48) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी, एका 22 वर्षीय तक्रारदार पोट ठेकेदार यांना रस्त्याचे काम मिळाले होते. त्या केलेल्या कामाचे 3 लाख 50 हजार रुपयांचे बिल झाले होते. ते बिल मंजूर करून धनादेश दिला होता. त्या मोबदल्यात 3 टक्के दरानेखेड, ता. सातारा येथील ग्रामसेवक ज्ञानेश्वर गायकवाड यांनी तक्रारदारांकडे पैशाची मागणी केली होती.
7500 रुपयांपैकी तडजोडी अंती 6500 रुपये गायकवाड यांना देण्याचे ठरले होते. याबाबत तक्रारदाराने सातारा येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाकडे तक्रार दाखल केली होती. प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली असता त्यात तथ्य जाणवल्यानंतर मंगळवार 8 रोजी सापळा लावला. तक्रारदाराकडून 6500 रुपयांची लाच स्वीकारताना ग्रामसेवक गायकवाड यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.