प्रतिनिधी/ खेड
दुबईतून आलेली अलसुरे येथील व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीयांसह 28 जणांना कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. या सर्वाचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला असल्याची माहिती प्रांताधिकारी अविशकुमार सोनोने यांनी दिली. यामुळे खेडवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, दोन दिवसात पाच गावांमधील 637 घरांचे सर्वेक्षण करून आरोग्य पथकाने 2769जणांची तपासणी केली.
शुक्रवारी रात्री मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या आणखी 8जणांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे. या सर्वांच्या स्वॅबनचे नमुने तपासणीसाठी मिरज येथे पाठवण्यात आले आहेत. कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात आयसोलेशनमध्ये असलेल्या 28 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असतली तरी आणखी 3 दिवस रूग्णालयातच ठेवून नंतर होम क्वारंटाईन करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
व्यक्तीच्या संपर्कातील नागरिकांचा शोध जारीच
अलसुरे येथील कोरोनाचा बळी ठरेल्या व्यक्तीच्या संपर्कात 60हून अधिक जण आले असल्याची माहिती पुढे आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे.
2 दिवसांत 637 घरांचे सर्व्हेक्षण
कोरोनाग्रस्ताच्या आसपासच्या गावामध्ये तपासणीसाठी आरोग्य विभागाने 26 पथके तैनात केली आहेत. पथकातील आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, अंगणवाडीसेविका, आशा, मदतनीस, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदीमार्फत गेल्या 2 दिवसांपासून अलसुरे, भोस्ते, कोंडिवली, मोरवंडे, निळीक या पाच गावांमध्ये सर्वेक्षणा मोहीम हाती घेण्यात आली आहे. पाचही गावांत डोअर टू डोअर जावून करण्यात येणाऱया सर्व्हेक्षणांतर्गत सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणांबाबत प्रत्येक नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. यामध्ये 637 घराना भेट देऊन 2769 जणांची तपासणी करण्यात आली.
अलसुरेसह पाच गावांतील भय काही अंशी संपुष्टात
अलसुरेतील व्यक्तीच्या मृत्युनंतर अलसुरेसह पाच गावातील ग्रामस्थ भीतीच्या छायेखाली होते. मात्र कुटुंबीयांसह 28 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्याने ग्रामस्थांमधील भीती काही अंशी संपुष्टात आली.
डाकबंगला परिसरातील मार्ग ‘लॉक’च
शहरातील डाकबंगला परिसर सील असून सर्व मार्ग अजूनही ‘लॉक’च आहेत. मृत व्यक्तीचा डाकबंगला परिसरात 4 दिवस वावर होता. या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून विशेष दक्षता घेत परिसरातील नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. या परिसरात नगर परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्वेक्षण हाती घेतले जाणार आहे.
आणखी दोघांची होम क्वारंटाईनमध्ये भर
तालुक्यात होम क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येत शनिवारी आणखी दोघांची भर पडली असून हा आकडा 302 वर जावून पोहचला आहे. यातील 253 नागरिकांची होम क्वारंटाईनची मुदत संपुष्टात आली असली तरी त्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. सहजीवन हायस्कूलमधील संस्थात्मक विलगीकरण कक्षात केवळ दोघेच उरले आहेत.
दापोलीतील दोघांचे अहवाल निगेटीव्
खेड येथील कोरोनाग्रस्त रुग्णाला भेटायला गेलेल्या दापोलीतील दोन नातेवाईकांचे अहवाल अहवालही निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे तालुक्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे खेड येथे कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यांतर नातेवाईकांचे सांत्वन करण्यासाठा हे दोघे खेड येथे गेले होते. त्यानंतर त्यांना घरी न जाता उपजिल्हा रुग्णालयात दाखल होण्याचे सूचवण्यात आले. यानुसार दोघे तपासणीसाठी रूग्णालयात दाखल झाले. त्यांची तपासणी करून स्वॅबचे नमुने तपासणीसाठी मिरजला पाठवले होते. शुक्रवारी सायंकाळी दापोली प्रशासनाला प्राप्त झालेल्या या अहवालात दोघेही निगेटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले.