आंबवलीतील 2 विद्यार्थ्यांसह वरवलीतील 6 जणांचा समावेश
प्रतिनिधी/ खेड
तालुक्यातील वरवली, आंबवलीत कोरोनाचा प्रसार वाढत असतानाच शुक्रवारी रात्री आणखी आठ जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. आंबवलीतील दोन विद्यार्थ्यांसह वरवलीतील सहा जणांचा यामध्ये समावेश आहे. नव्या रुग्णांमुळे तालुक्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1 हजार 550 झाली आहे. झपाटय़ाने वाढणाऱया कोरोना रुग्णांमुळे आरोग्य यंत्रणेची धावपळही वाढली आहे.
तालुक्यातील वरवली-धुपेवाडी कोरोनाचे हॉटस्पॉट बनत असतानाच लगतच्या आंबवली गावातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आंबवली न्यू इंग्लिश स्कूलमधील एका विद्यार्थ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विद्यालय 20 तारखेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय व्यवस्थापनेने घेतला होता. दरम्यान विद्यालयातील 45 विद्यार्थ्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. यातील दोन विद्यार्थ्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शाळा आणखी काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे. वरवली गावात कन्टेनमेंट झोन जाहीर झाल्यापासून कोरोनाचे रुग्ण वाढतच असल्याने या ठिकाणी तैनात आरोग्य पथकांचा मुक्कामही वाढत आहे. आरोग्य पथकांकडून सर्वेक्षणाची मोहीम अजूनही सुरूच आहे. वरवली-धुपेवाडीतील कोरोनाबाधितांची संख्या 47 वर पोहोचल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.